breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

लाच घेतल्यास थेट बडतर्फ!

मुंबई पोलिसांना आयुक्तांची तंबी; लाचखोरी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

मुंबई : गेल्या काही दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) मुंबई पोलिसांची एकामागोमाग एक याप्रमाणे लाच प्रकरणे बाहेर येत असल्याने कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाच नियम आखून देण्याची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर पोलीस आयुक्त सुबोध जायस्वाल यांनी यापुढे लाचप्रकरणी पकडले गेल्यास बडतर्फच केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय आणि प्रादेशिक मुख्यालयांतून प्रतिबंधात्मक उपायांची आखणी सुरू झाली आहे.

अवघ्या पाच दिवसांत मुंबई पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले. याची दखल घेत पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्तांची बैठक बोलावून प्रादेशिक विभागातील भ्रष्टाचाराच्या व कर्तव्यात कसुरी करणाऱ्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले. यात गुन्हे शाखेचाही समावेश होता. यादीतील काहींची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. तसेच, एसीबीने पकडलेल्या एका अधिकाऱ्याला आयुक्तांनी बडतर्फ केले. ही कारवाई आणखी दोन शिपायांवर झाल्याचे समजते.

देवनार पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्ता चौधरी यांना भारतीय घटनेच्या ३११व्या कलमानुसार बडतर्फ करण्याचा आदेश जयस्वाल यांनी जारी केल्यानंतर प्रचंड खळबळ माजली. गुन्हेगारांशी संबंध असणे वा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांवर आतापर्यंत या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे. मात्र लाच घेताना पकडले गेल्यानंतर अगदी पोलिसाला शिक्षा झाली तरी आतापर्यंत बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली नव्हती.  सदर निरीक्षक महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे दाद मागून आपली बडतर्फी रद्द करून घेईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस आयुक्त जयस्वाल यांनी रुद्रावतार धारण केला होता, अशी माहिती मिळाली आहे. ‘तुम्ही कशासाठी पोलीस दलात आलात,’ असा सवाल आयुक्तांनी या अधिकाऱ्यांना केला. ‘तुम्ही आपली कर्तव्ये विसरलात का? मात्र मी असे करू शकत नाही. जे काही परिणाम होतील त्याला मी सामोरे जाईन, असे स्पष्ट करीत जयस्वाल यांनी बडतर्फीच्या निर्णयाचे समर्थन केले. याप्रकरणी कुठल्याही प्रकारचा रोष स्वाकीरण्यास आपण तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयुक्तांच्या सूचना

* पोलीस ठाण्यात विनाकारण रेंगाळणाऱ्यांना बाहेर काढा.

* कामाशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नका.

* कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.

* मोबाइलवर किंवा प्रत्यक्ष बोलताना नियंत्रण ठेवा.

* पोलीस ठाण्याबाहेरच्या हालचालींचा अंदाज घ्या.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धास्ती

या सगळ्या पाश्र्वभूमीवर सध्या पोलीस दलात एसीबीची धास्ती आहे. एसीबीकडून सापळे लावले जात असल्याने सावध राहा, असे संदेश पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहांवर फिरत आहेत. त्यामुळे एरवी दाट, मिश्र लोकवस्ती किंवा झोपडपट्टी असलेली पोलीस ठाणी नागरिकांनी गजबजलेली असत. त्या ठिकाणी सध्या कमालीची शांतता आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी एसीबी कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता महासंचालक संजय बर्वे बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button