breaking-newsमुंबई

रेल्वेमंत्र्यांनी एमआरव्हीसीला पुन्हा फटकारले

  • ठाणे-दिवा पाचवा, सहावा मार्ग लवकर पूर्ण करा!ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाबाबत सध्या रेल्वेमंत्री व एमआरव्हीसी, मध्य रेल्वेत चांगलीच खडाजंगी सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामाची मार्च २०१९ची मुदत हुकणार असल्याने आणखी विलंब न होता हे काम  वेळेत पूर्ण करण्याची सूचना पुन्हा एकदा एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आणि मध्य रेल्वेला रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केली आहे.

    मेल-एक्सप्रेस गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेवर एमआरव्हीसीमार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळे लोकल गाडय़ांचा प्रवासही सुकर होणार आहे. मात्र ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम अद्यापही बाकी असून कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंत पाचवा-सहावा मार्ग झाला आहे.

    गेल्या दहा वर्षांत ठाणे-दिवा मार्गासाठी आतापर्यंत अनेक वेळा अंतिम मुदत देण्यात आली. आता मार्च २०१९ ही अंतिम मुदत असतानाही मुंब्राजवळ दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग, रुळांसह अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. साधारण २०१९ मधील पावसाळ्यानंतर ही मार्गिकेवरून गाडय़ा धावू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

    सध्या या मार्गिकेच्या कामावरून रेल्वेमंत्री आणि एमआरव्हीसी, मध्य रेल्वेत खडाजंगी सुरू आहे. गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. त्यावेळीही ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली होती.

    शुक्रवारी झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एमआरव्हीसीला पुन्हा एकदा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली आहे. गोयल यांनी मुंबईत येऊन मध्य व पश्चिम रेल्वेबरोबरच एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन प्रकल्पांचा व नवीन सोयीसुविधांचा आढावा घेतला. या मार्गिकेच्या कामांसाठी आणखी विलंब होता कामा नये, असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एमआरव्हीसी व मध्य रेल्वेची एकच धावपळ उडाली आहे. एमआरव्हीसीने आता जून २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

    वक्तशीरपणा पाळण्याच्या सूचना

    मेल-एक्सप्रेस व लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणा संदर्भातही शुक्रवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पश्चिम व मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात आणखी सुधारणा झाली पाहिजे, असे रेल्वेमंत्र्यांनी पश्चिम व मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना बजावले. येत्या नोव्हेंबरपासून ९० टक्क्यांपेक्षा जास्त वक्तशीरपणा पाळण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

    एमआरव्हीसी, रेल्वेची धावपळ

    रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेमुळे एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. एमआरव्हीसीने आता जून २०१९ पर्यंत  काम पूर्ण करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाचा खर्च ११५ कोटी रुपयांवरून ४४० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button