breaking-newsपुणेमहाराष्ट्र

राजकीय गुन्हेगारीच्या प्रश्नाला पोलीस आयुक्तांची बगल

कार्यक्रमाला झालेला उशीर, ऐनवेळी आलेला पाऊस, त्यामुळे उडालेला गोंधळ, अपुऱ्या जागेमुळे नियोजनाचा उडालेला बोजवारा, पूर्ण तयारी झाली नसताना उद्घाटनाची घाई, लोकप्रतिनिधींचे मानापमान नाटय़ या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा पहिला दिवस बुधवारी (१५ ऑगस्ट) पार पडला. शहराची वाढती गुन्हेगारी व राजकीय पाश्र्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांविषयीचे अडचणीचे प्रश्न विचारताच पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद गुंडाळण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथे नव्या पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू करण्यात आले, त्याचा प्रारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त चुकू नये म्हणून पोलीस आयुक्तालयासाठी आवश्यक सुविधांची तयारी नसताना कामकाज सुरू करण्याची घाई झाल्याने नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बापट व पद्मनाभन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील व त्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. एखादी घटना घडल्यास तातडीने पोलीस उपलब्ध होतील याचे नियोजन करू, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. तोडफोडीसह शहरातील वाढती गुन्हेगारी, पोलिसांच्या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय पाश्र्वभूमी असणारे सराईत गुन्हेगार याविषयीचे प्रश्न विचारल्यानंतर पोलीस आयुक्त गोंधळून गेले. त्यांना समाधानकारक उत्तर देता येत नसल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात आले. वर्षभराचे प्रश्न आताच विचारणार का, अशी टिपणी करत त्यांनी उरकण्यास सांगितले. त्यानुसार, क्षणात पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले.

कारभारी आमदार गैरहजर

भाजपचे शहराध्यक्ष व कारभारी आमदार लक्ष्मण जगताप पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमास गैरहजर होते. जगताप शहरातच होते. इतर कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली, मात्र या समारंभाकडे पाठ फिरवली. निमंत्रण नव्हते म्हणून नाराज झाल्याने ते आले नाहीत, असे त्यांचे समर्थक सांगत होते. यासंदर्भात पत्रकारांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे विचारणा केली असता, जगताप बाहेरगावी असल्याने आले नाहीत, असे त्यांनी सांगितले. पालिका पदाधिकारी व इतर नगरसेवकांनीही मानापमान नाटय़ातून नाराजीचा सूर व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button