breaking-newsक्रिडा

.. म्हणून कुस्तीतून निवृत्त होणार होतो!

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या राहुल आवारेचा गौप्यस्फोट

जवळपास १० वर्षे मी सीनियर गटाचे राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. त्यानंतर नियमानुसार मला महत्त्वाच्या स्पर्धामध्ये डावलले गेले. मी कुठेही कमी पडत नव्हतो. २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही मला डावलण्यात आले. ज्या प्रतिस्पध्र्याला १०-० अशा फरकाने हरवत होतो, त्याच खेळाडूला लंडन ऑलिम्पिकचे तिकीट देण्यात आले. काळ थांबत नव्हता. वयही वाढत होतं. त्यातच माझे गुरू महान कुस्तीपटू हरिश्चंद्र बिराजदार यांनी जगाचा निरोप घेतला. २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही भारतीय कुस्ती महासंघातील राजकारणामुळे मला डावलण्यात आले. १० वर्षे खडतर मेहनत घेऊनही अपयश पदरी पडत होते. त्यामुळेच खडतर तपश्चर्येनंतर मी अखेर कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकजिंकणारा कुस्तीपटू राहुल आवारे याने केला.

२०१७ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा होणार होती. अखेरच्या वेळी प्रयत्न करायचे, अशीच खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यावेळी माझ्या गटात जागतिक विजेत्या, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंचा समावेश होता. पण १० तोंडाच्या रावणाला एकाच बाणामध्ये गारद करायचे, हे ठरवले होते. सर्वावर मात करून मी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी स्थान मिळवले, अशीही आठवण राहुलने सांगितली. स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राहुल आवारेला यावर्षीचा सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने गौरविण्यात आले.

तो म्हणाला की, ‘‘देशासाठी पदकजिंकता आले, यातच मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. देशासाठी काहीतरी केले पाहिजे, हे आधीच ठरवले होते. तो मान मला सुवर्णपदकाने दिला. आता २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी सज्ज होण्यासाठी मेहनत घेणार आहे. ऑलिम्पिक पदकजिंकण्याचा निर्धार मी बाळगला आहे.’’

सचिन तेंडुलकरने मनोधैर्य उंचावले -जेमिमा

‘‘ भारतीय महिला क्रिकेट संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी माझी निवड झाली तेव्हा तेथील वेगवान खेळपट्टय़ांविषयी ऐकून माझ्या मनात धडकी भरली होती. अशातच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मला घरी बोलावून माझे मनोधैर्य उंचावले. खेळपट्टय़ा हे मनाचे खेळ आहेत. तू तुझे फटके खेळत राहा. नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोनच गोष्टी असतात. तू सकारात्मकतेची कास धर, हा सचिन सरांचा मंत्र माझ्यासाठी खूपच फायदेशीर ठरला,’’ असे या वर्षीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button