breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मोडकसागरही तुडूंब

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी दोन तलाव भरले

मुंबई : पावसाने मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांमध्ये दमदार हजेरी लावली असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी एक असलेला मोडकसागर तलाव रविवारी दुपारी ओसंडून वाहू लागला.

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांमधून मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. गेले काही दिवस मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आता अन्य तलावक्षेत्रात दमदार हजेरी लावली असून मोडकसागर तलावही रविवारी दुपारी ३.०५ च्या सुमारास ओसंडून वाहू लागला. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी मोडकसागर भरून वाहू लागला होता. मोडकसागर तलावाची पाणी साठवणुकीची कमाल पातळी २८५ मीटर, तर किमान पातळी २२० मीटर इतकी आहे. मुंबईकरांना या तलावातून दर दिवशी ४४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मोडकसागर तलावातील पाण्याची कमाल पातळी रविवारी दुपारी ओलांडली आणि तो ओसंडून वाहू लागला. या तलावाची वापरायोग्य पाणी साठविण्याची क्षमता एक लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर इतकी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून दर दिवशी ३९०० दशलक्ष लिटर पाणी मोठय़ा जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईतील जलशुद्धीकरण केंद्रात वाहून आणले जाते. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३७५० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिन्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून मुंबईकरांच्या घरी पोहोचविले जाते. मुंबईकरांना पुढील वर्षभर सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करता यावा यासाठी या सातही तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी तब्बल १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असून दुसरा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. असाच पाऊस पडत राहिला तर लवकरच सर्व तलाव ओसंडून वाहतील आणि मुंबईकरांना भविष्यात सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पालिकेच्या जल विभागातील अभियंत्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button