breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मुख्य धमनीलाच “ब्लॉकेज’

शिवाजी रस्त्याची स्थिती : “ऑल टाइम रश’ असूनही दुर्लक्ष

अतिक्रमणांचे “दुकान’; पथारींची गर्दी, वाहतूक मात्र “तुंबलेली’

पुणे – जवळपास महत्त्वाचे रस्ते जोडणारा आणि पर्यटन, धार्मिक स्थळे असणारा छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा शहराची मुख्य धमनीच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महापालिकेकडून निघाल्यास या रस्त्याने थेट साताऱ्यालाच पोहोचू, एवढा मोठा हा रस्ता स्वारगेटपर्यंत “छत्रपती शिवाजी महाराज रस्ता’ म्हणून ओळखला जातो.

या रस्त्यावर मंदिरे, पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक वास्तू, मंडई आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालयेही आहेत. त्यामुळे हा रस्ता 12 महिने वाहतुकीने ओसंडून वाहतो. त्यातून सण-वारांच्या काळात तर याठिकाणी वाहन चालवणे म्हणजे वाहनचालकाला “पदक’च बहाल करावे लागेल. एवढेच नव्हे, तर शहरातील सर्वांत जास्त बसच्या फेऱ्याही याच रस्त्यावरून होतात. कात्रजला जाणाऱ्या बसेसची संख्या तर जास्त आहेच, परंतु महापालिकेहून सुटणाऱ्या आणि नंतर लक्ष्मी रस्तामार्गे अन्य ठिकाणी जाणाऱ्या बसही याच रस्त्यावरून जातात. त्यामुळे “ऑल टाइम रश’ या रस्त्यावर असते. माणसे, वाहनांनी ओसंडून वाहणारा रस्ता असल्याने साहजिकच अतिक्रमणे, दूरवस्था, बेकायदेशीर व्यवहार या सगळ्या गोष्टी या रस्त्यावर पाहयला मिळतात म्हणजे मिळतातच. याशिवाय डांबरीकरणाचे पॅच, रस्त्यांवरील खड्डे आणि पेव्हरिंग ब्लॉक हा तर या रस्त्याच्या इतिहासातील “ऐतिहासिक दस्तऐवज’च म्हणावा लागेल.

शनिवार वाडा ते लालमहाल

शनिवारवाड्यापासून या रस्त्यावरील अतिक्रमणे आणि अव्यवस्थेला सुरूवात होते. बाजीराव रस्ता ज्या नव्या पुलापाशी संपतो, तेथे शनिवारवाड्याला वळसा घालून शिवाजी रस्त्याला लागणारी वाहने, महापालिकेसमोरून नव्या पुलावरून येणारी आणि जुन्या बाजाराकडून येणारी वाहने ही कसबा पोलीस चौकीसमोर एका ठिकाणी थांबतात. उतार असल्याने येथे वाहनचालकांना करकचून ब्रेक लावावा लागतो. त्यातून तेथे पुणेदर्शन, खासगी पर्यटन, शाळांच्या सहलींची वाहने, शनिवारवाड्यावर होणारे कार्यक्रम आणि त्यांच्या वाहनांची गर्दी असेल, तर काही विचारायचीच सोयच नाही! एका बाजूला शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू, रस्ता रुंदीकरणाला फारसा वाव नसल्याने अरुंद झालेला भाग, त्यातून फुटपाथवर मोबाइल कव्हर, रुमाल आणि अन्य काही बेकायदेशीर गोष्टी विकणारे पथारीवाले बसलेले असतात.

लालमहाल ते बुधवार चौक (मजूरअड्डा)

लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच वरचेवर याठिकाणी अनेक कार्यक्रमही होतात. त्यामुळे कायमच या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. नवग्रह मंदिर, त्यासमोर अर्धा रस्ता व्यापून बसलेले भिकारी, भाविकांची वाहने, दर्शन रांग यातून वाट काढत वाहनांना पुढे जावे लागते. त्याआधी असलेला वसंत टॉकिजसमोरचा बसस्टॉप . त्याच्याजवळही अक्षरश: वाट पाहणारे प्रवासी निम्मा रस्ता अडवतात. त्यामुळे बसेस रस्त्याच्या मधोमध थांबतात. त्यामुळे मागची वाहतूकही “तुंबते’. लालमहाल चौक ते बुधवार चौक सिग्नलमध्ये अंतर खूपच कमी असल्याने मजुरअड्डा सिग्नलला थांबलेल्या वाहनांची रांग लाल महालापर्यंत येते आणि तेथे सदासर्वकाळ वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.

बुधवार चौक ते सिटीपोस्ट

हा रस्ता तर रात्री 12 पर्यंत वाहता असतो. दगडूशेठ गणपती मंदिरात होणारी गर्दी, मजूर अड्डा चौक, तेथेच असलेले कसबा-विश्रामबाग पोलीस ठाणे, ग्रामदेवता आणि वह्या-पुस्तकांची बाजारपेठ असलेल्या अप्पा बळवंत चौकाकडे जाण्याचा रस्ता, इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठ असलेला पासोड्या विठोबाकडे जाणारा रस्ता या सगळ्यांमध्ये हा चौक अक्षरश: गुदमरून जातो. पीएमपी सहज वळवता येऊ नये, यासाठीच लावलेले बॅरिकेट्‌स असा प्रकार येथे आहे. येथून संथ गतीने पुढे जाताना, मंदिरापुढे क्षणभर थांबणारे वाहनचालक असतातच. याशिवाय खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य विक्रेत्यांची घाई आणखी वेगळीच. अक्षरश: शहरातील निम्म्या वाहतूक पोलिसांची संख्या येथे असूनही, कोंडी कायम असणारा हा चौक आहे.

सिटी पोस्ट ते रामेश्वर चौक

या भागातूनही वाहन चालवणे म्हणजे दिव्यच! येथून मंडईकडे जाणारा कोतवाल चावडीजवळील एक रस्ता आणि पुढे रामेश्‍वर चौकाचा रस्ता हे अत्यंत गर्दीचे रस्ते आहेत. दत्तमंदिर, तेथून पुढे गेल्यानंतर डावीकडे “रेडलाइट’कडे जाणारा रस्ता, लॉटरी सेंटर्समध्ये होणारी गर्दी, झालेले रस्ता रुंदीकरणही पूर्णपणे हॉकर्सने बळकावली आहे. तेथे अनेकदा कारवाई करूनही परिस्थिती “जैसे थे’ च असते. सण-समारंभात येथील गर्दी आवरणे भल्या-भल्या महारथींनाही अशक्‍य होते. पुढे रामेश्‍वर चौकात भांड्यांच्या दुकानांमुळे लग्नसराईत तर नातलगांसह पुणे परिसरातून येणारी मंडळी त्यांची वाहने यामुळे वाहतूक कोंडी ही रोजचीच आहे. हा रस्ता इतर ऋतूंमध्ये तर खड्डेमय असतेच, परंतु पावसाळ्यात “वाळवंटात उंटावरून चालण्याचा फील’ होतो.

रामेश्‍वर चौक ते फडतरे चौक

रामेश्‍वर चौकातून पुढे मंडईचा बसथांबा म्हणजे, या भागाचे “प्राईम लोकेशन’च. बाजारहाट करून या थांब्यावर अनेकजण बसची वाट पाहात रस्त्यावरच येतात. तेथेच शेअर रिक्षा, टेम्पोचालक यांची गडबड असते. गोटीरामभैय्या चौकात तर पादचारी आणि वाहनचालक यांची सर्कसच असते. पुढे बोहरी आळीत जाणाऱ्यांची गडबड तर काही औरच. एकेरी वाहतूक असताना या रस्त्याची ही स्थिती आहे. त्यामुळे त्याचाही उपयोग नाही अशी स्थिती आहे.

फडतरे चौक ते राष्ट्रभूषण चौक

खडक पोलीस ठाणे, मामलेदार कचेरी या भागात आहेत. याठिकाणी पेव्हरिंग ब्लॉक टाकून रस्त्याचा प्रयोग महापालिकेने केला आणि तो सपशेल “फेल’ गेला. हे पेव्हरिंग ब्लॉक उखडून आणखी नवीनच संकट उभे राहिले. ते निसरडे झाल्याने वाहन घसरून कपाळमोक्ष ठरलेलाच. येथे शाहू कॉलेज आणि शाळाही असल्याने विद्यार्थी येथून वाहतूकही होते.

राष्ट्रभूषण चौक ते जेथे चौक (स्वारगेट चौक)

फळवाले आणि भाजीवाले यांनी भरलेला हा भाग म्हणजे “मिनी मंडई’च आहे. याला स्वारगेट कॉर्नर म्हणतात. चारही बाजून येणारे रस्ते या चौकात येतात. त्यामुळे हा रस्ताही तुंबलेला असतो.

भुयारी मेट्रोचाही प्रस्ताव

एलिव्हेटेड मेट्रो या रस्त्यावरून करणे अशक्‍यच असल्याने येथे भुयारी मेट्रोच प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे स्वारगेटपर्यंत मोठी कसरत करतच मेट्रोचे काम चालणार आहे.

ड्रेनेज मॅनहोल्स रस्त्यावरच

ड्रेनेजचे मॅनहोल्स रस्त्यावरच असल्याने आणि त्याची दुरुस्ती निघाली तर अर्धा रस्ताच बंद करावा लागतो. चेंबरची झाकणेही निघालेली असून, काही झाकणांना थातूरमातूर मलमपट्टी करून तशीच ठेवली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button