breaking-newsक्रिडा

मालिका विजयासाठी भारतीय महिला सज्ज

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज

माऊंट माँगानुए : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात निर्विवादपणे वर्चस्व गाजवल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या सामन्यातसुद्धा विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य असणार आहे.

माऊंट माँगानुए येथे रंगणाऱ्या या सामन्यात भारताची मदार प्रामुख्याने स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रिग्ज हे सलामीवीर व फिरकी त्रिकुटावर राहणार आहे. प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय महिलांनी पहिल्या सामन्यात यजमानांचा नऊ गडी राखून धुव्वा उडवला. एकता बिश्त, पूनम यादव व दीप्ती शर्मा या फिरकी त्रिकुटाने एकूण आठ बळी पटकावत विजयाचा पाया रचला, तर स्मृतीने दमदार शतक व जेमिमाने संयमी अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सुरू असलेल्या या महिलांच्या अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानी असून २०२१च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याकरता ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे. त्यामुळे ही मालिका जिंकून भारताला २०१४ मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या २-१ अशा पराभवाची परतफेड करता येऊ शकते. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला याची पूर्ण जाणीव असल्याने ते नक्कीच दुसऱ्याच सामन्यात न्यूझीलंडच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळवतील, अशी अपेक्षा आहे.

दुसरीकडे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या न्यूझीलंडचा २०२१च्या विश्वचषकातील प्रवेश यजमानपद मिळाल्यामुळे थेट निश्चित झाला आहे. कर्णधार अ‍ॅमी सॅटेर्थवेट आणि सूझी बेट्स यांच्यावर न्यूझीलंडची भिस्त आहे.

संभाव्य संघ

* भारत : मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), दयालन हेमलता, शिखा पांडे, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, पूनम यादव, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, मोना मेश्राम, मानसी जोशी.

* न्यूझीलंड : अ‍ॅमी सॅटेर्थवेट (कर्णधार), सूझी बेट्स, बर्नाडिन बेझुडेनहॉट (यष्टिरक्षक), सोफी डीव्हाईन, लॉरेन डॉऊन, मॅडी ग्रीन, होली हुडलस्टन, लेग कास्परेक, अमेलिआ कीर, कॅटी पर्किन्स, अ‍ॅना पीटरसन, हॅना रोवी, ली ताहुहू.

* सामन्याची वेळ : सकाळी ६.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button