breaking-newsक्रिडा

महिला स्क्‍वॅश संघ हॉंगकॉंगकडून पराभूत

  • उपान्त्य फेरीत गतविजेत्या मलेशियाचे खडतर आव्हान 

जकार्ता– सुनयना कुरकुविलाच्या कडव्या झुंजीनंतरही भारताच्या महिला स्क्‍वॅश संघाला अखेरच्या गटसाखळी लढतीत हॉंगकॉंगकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला महिला स्क्‍वॅश संघाने याआधीच उपान्त्य फेरी निश्‍चित केली असली, तरी या पराभवामुळे आशियाई क्रीडास्पर्धेच्या उपान्त्य फेरीत त्यांना अधिक अवघड प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे. आता उपान्त्य लढतीत भारतीय महिलांसमोर गतविजेत्या मलेशियाचे आव्हान आहे.

त्याआधी भारताच्या महिला व पुरुष स्क्‍वॅश संघांनी उपान्त्य फेरीत धडक मारताना आशियाई क्रीडास्पर्धेत भारताच्या आणखी दोन पदकांची निश्‍चिती केली आहे. स्क्‍वॅशमध्ये भारताचे हे चौथे पदक ठरेल. दीपिका पल्लीकल, जोश्‍ना चिनाप्पा व सौरव घोषाल यांनी याआधी एकेरीत कांस्यपदके पटकावली असून पुरुष संघाने गेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

जोश्‍ना चिनाप्पा, दीपिका पल्लीकल, सुनयना कुरुविला व तन्वी खन्ना यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला स्क्‍वॅश संघाने अगोदरच्या गटसाखळी लढतीत बलाढ्य चीनचे आव्हान 3-0 असे मोडून काढताना आपली अपराजित घोडदौड कायम राखली होती. परंतु हॉंगकॉंगविरुद्धच्या पराभवामुळे ब गटातून पहिल्या क्रमांकाने बाद फेरी गाठण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न अपयशी ठरला. गेल्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने याआधीच्या गटसाखळी लढतींमध्ये इराण, थायलंड व इंडोनेशिया यांना पराभूत केले होते.

हॉंगकॉंगविरुद्धच्या लढतीत दीपिका पल्लीकल व जोश्‍ना चिनाप्पा या अनुभवी खेळाडूंनी पराभव पत्करल्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. तर दीपिकाला जोए चॅनने 3-1 असे पराभूत करीत हॉंगकॉंगला 1-0 असे आघाडीवर नेले. सुनयना कुरुविलाने त्झे लोक हो हिच्यावर 5-11, 13-15, 11-6, 11-9, 14-12 अशी प्रदीर्घ लढतीनंतर संघर्षपूर्ण मात करताना भारताचे आव्हान कायम राखले. परंतु जोश्‍नाने ऍनी आऊ हिच्याविरुद्ध 0-3 अशी हार पत्करल्यामुळे हॉंगकॉंगने 2-1 अशी बाजी मारताना ब गटातून पहिल्या क्रमांकाने उपान्त्य फेरी गाठली.

पुरुष गटांत भारताने थायलंडचा 3-0 असा फडशा पाडला. सौरव घोषालने पूनसिरी फूविसला 3-0 असे नमविले. तर रमित टंडनने फत्रप्रसित आरनोल्डचा 3-0 असा पराभव केला. महेश माणगावकरने जिवासुवान नथ्थाकिटवर 3-0 अशी मात करून भारताच्या विजयाची निश्‍चिती केली. पुरुष संघाने गेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button