breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

महायुतीचे बारणे यांना विजयी करण्यासाठी भर उन्हातही कार्यकर्ते प्रचारात मग्न

रसायनी: ऐन उन्हाळ्यातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणूक प्रचाराचे तापलेले रण तर दुसर्‍या बाजूला उन्हाच्या तीव्र झळा यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. लोकसभेचा भलामोठा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी निघालेल्या उमदेवार व कार्यकर्त्यांना भर उन्हात मतदारांशी संवाद साधणे कठीण होऊन बसले आहे. उन्हाच्या तीव्रतेने निवडणूक प्रचार प्रसारप्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
एप्रिल आणि मे हे महिने कडक उन्हाळ्याचे असतात. याच काळात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सध्या उन्हाची काहिली वाढल्याने कार्यकर्त्यांना सभा व बैठकीला माणसे गोळा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तापमानात वाढ झाल्याने कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होत असला तरी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कार्यकर्ते तहान, भूक व उन्हाची पर्वा न करता प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. उमेदवार आपल्या प्रचाराच्या सभा सूूर्य मावळल्यानंतर सायंकाळी ठेवणे पसंत करीत आहेत. उन्हाच्या काहिलीने घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे प्रचार व प्रसाराकरिता सायंकाळची वेळच उमेदवारांना सोईची ठरत आहे.
प्रचाराकरिता मिळालेल्या कमी कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघात पोहचणे म्हणजे उमेदवारांसह कार्यकर्त्यांसमोर मोठे आव्हानच निर्माण झाले आहे. मात्र भर उन्हातही पक्षनिष्ठा व नेत्यावरील प्रेम यामुळे तापत्या उन्हातही ‘हमारा नेता कैसा हो….  अप्पा बारणे जैसा हो…’ असा सूर कार्यकर्त्यांकडून आळवला जात असून वाढत्या उष्म्यातही रसायनी, पाताळगंगा परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. मोहोपाडा, नवीन पोसरी, शिवनगर परिसरात महायुतीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून वासांबे परिसरातील प्रचारही येत्या काही दिवसांत पूर्ण होईल असा विश्वास शिवसेना विभागप्रमुख अजित सावंत यांनी दर्शविला. यावेळी उपतालुकाप्रमुख रमेश पाटील, जिल्हा महिला आघाडीच्या अनघा कानिटकर, माजी सरपंच निलम पाटील, माजी उपसरपंच सदगुणा पाटील, उपविभाग प्रमुख कृष्णा पाटील, मंगेश पाटील, माजी सरपंच रोशन राऊत, युवा सेनेचे संतोष पांगत आदींसह कार्यकर्ते भर उन्हात प्रचार करताना दिसत आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button