breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महापौरांसह पालिका पदाधिकाऱ्यांची परदेश दौऱ्याची लगबग

टीका टाळण्यासाठी विमान प्रवास स्वखर्चाने करण्याचा निर्णय

मुंबईचे भगिनी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जर्मनीतील स्टुटगार्ट येथे २५ ते २८ सप्टेंबर रोजी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमित्त साधून मुंबईचे महापौर, वैधानिक समित्यांचे अध्यक्ष आणि सर्वपक्षीय गटनेते स्टुटगार्ट दौऱ्यावर रवाना होण्याची तयारी करीत आहेत. मात्र अभ्यास दौऱ्यांवरून होणारी टीका लक्षात घेत महापौर, वैधानिक समिती अध्यक्ष आणि गटनेत्यांनी स्वखर्चाने विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या सर्वाना अद्यापही व्हिजा मिळू शकलेला नाही. त्यामुळे स्टुटगार्ट दौरा अधांतरीच आहे.

पालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्यांसाठी दरवर्षी अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात येते. सदस्यांना विविध शहरांमध्ये जाऊन तेथील नागरी सुविधांचा अभ्यास करता यावा म्हणून या दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. अलीकडेच महापौरांसह सर्व पक्षांच्या गटनेते रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र आयत्या वेळी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी रशियाला जाणे रद्द केले. त्यामुळे टीका होण्याची भीती लक्षात घेत रशिया दौरा रद्द करण्यात आला होता. स्टुटगार्टमध्ये भगिनी शहर संबंधित सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे निमंत्रण महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

त्यामुळे स्टुटगार्टला जाण्याचा निर्णय या सर्वानी घेतला आहे. गटनेत्यांच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत स्टुटगार्ट दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी येत्या २४ सप्टेंबर रोजी विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह उपमहापौर हेमांगी वरळीकर, विरोधी  पक्षनेते रवी राजा,  विशाखा राऊत, यशवंत जाधव,  दिलीप लांडे,  आशीष चेंबूरकर, मंगेश सातमकर, भाजपचे गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या  राखी जाधव, समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी स्टुटगार्टला जाण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र यापूर्वी पालिकेच्या तिजोरीतील पैसे खर्च करून केलेल्या दौऱ्यांमुळे टीका झाली होती.

  • यापूर्वी पालिकेच्या तिजोरीतील पैसे खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यांमुळे नेते टीकेचे धनी ठरले होते.
  • ही बाब लक्षात घेऊन या सर्वानी विमान प्रवास स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तेथील वास्तव्य आणि फिरण्यासाठी वाहनांची व्यवस्था स्टुटगार्टमधील यंत्रणेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर भार येणार नाही, असे दौऱ्यावर जाण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button