breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदाची भरती निघणार

आयुक्तांपुढे प्रस्ताव ; आरोग्य, वैद्यकीय, सुरक्षा, अग्नीशमनसह सुमारे सातशे पदे भरणार

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील शासन मंजूर 9 हजार 754 पदापैकी सुमारे 2 हजार 481 पदे रिक्‍त आहेत. यामुळे सर्वच विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. मात्र, रिक्‍त पदामुळे सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त कामाचा ताण येवू लागला आहे. त्यामुळे आरोग्य, वैद्यकीय, सुरक्षा आणि अग्नीशमन या अत्यावश्यक सेवेसह अन्य विभागातील मंजूर रिक्त पदाची भरती काढण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यापुढे प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराची 1981 मधील जनगणनेनुसार 2 लाख 49 हजार 364 एवढी लोकसंख्या झाली होती. या लोकसंख्येच्या आधारावर 11 ऑक्‍टोबर 1982 रोजी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले. त्यानुसार महापालिकेत गट अ- 85, गट ब – 208, गट क – 2987 तर गट ड – 4181 अशा एकूण 7 हजार 461 एवढे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे डिसेंबर 2015 अखेर कार्यरत होते. मात्र, महापालिकेत सामाविष्ट 18 गावाचा समावेशाने महापालिकेचे क्षेत्रफळ प्रचंड वाढले. आता महापालिकेचे क्षेत्रफळ 177.3 चौरस किलो मीटर एवढे झालेले आहे. तर मिळकतींची संख्याही 4 लाख 7 हजार 910 एवढी झालेली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रफळ व कामांचा ताण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येवू लागला आहे. तरीही महापालिकेत सरळसेवेने कर्मचारी भरती झालेली नाही.

महापालिका आस्थापनेवर शासन मंजूर असलेल्या गट अ -220, गट ब – 269, गट क -3890, गट ड इतर – 2792, ड सफाई संवर्ग 2593 ही वर्ग एक ते वर्ग चार अशा एकूण 9 हजार 764 पदे मंजूर आहेत. यामध्ये महापालिकेत कार्यरत असणाऱ्याची संख्या नगण्य आहे. यात गट अ – 81, गट ब – 220, गट क – 2865, गट ड इतर – 2098 आणि ड सफाई संवर्ग 1919 अशी एकूण 7,183 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर सध्यस्थितीत पालिका आस्थापनेवर गट अ – 139, गट ब – 49, गट क – 1025, गट ड इतर – 694, गट ड सफाई – 674 असे एकूण – 2481 पदे रिक्‍त आहेत.

महापालिका प्रशासन विभाग हा उपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच अतिरिक्‍त काम करुन घेत आहे. यामुळे अधिकारी व कर्मचारी कामाच्या त्रासाने वैतागला असून, अनेकांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय अवलंबला आहे. तसेच, मार्च 2019 पर्यंत महापालिकेतील किमान 30 टक्के अधिकारी व कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर अधिकच कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या प्रशासन विभागाने सध्यस्थितीत शासन मंजूर असलेली रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आयुक्तांपुढे प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये आरोग्य, अग्नीशमन, वैद्यकीय, सुरक्षा या अत्यावश्यक सेवेसह अन्य विभागातील काही पदे भरण्यात येणार आहेत. साधारणता वर्ग 2 ते 4 पदाची भरती येणार आहे. याबाबत प्रस्ताव अद्याप आयुक्तांच्या टेबलावर प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवला आहे.

आकृतीबंध दीड वर्षे झाले “लालफितीत’
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्षेत्रफळ, लोकसंख्या व मिळकतीचा संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे क वर्गातील महानगरपालिका 1 सप्टेंबर 2014 मध्ये ब वर्गात रुपांतर झालेली आहे. महानगरपालिका आस्थापनेवरील सर्वच विभागात भविष्यात लागणारा वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करुन राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. मात्र, सरकारी लालफिती कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गेल्या दीड वर्षांपासून आकृतीबंध पडून राहिला आहे. याकडे सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button