breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शाळांमध्ये ‘’उन्नती प्रकल्प’’ राबविणार – सभापती सोनाली गव्हाणे

  • विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण समितीचा निर्णय
पिंपरी, ( महा-ई-न्यूज ) –  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात यावी, याकरिता महापालिका शिक्षण समिती ‘अध्ययन स्तर निश्चिती’ वर भर देणार आहे. त्याकरिता प्राथमिक स्तरानुसार शिक्षकांना निकष ठरवून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांचा सर्व्हे करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासणी होणार आहे.  याशिवाय दिलेल्या मुदतीत आणि निकषांनुसार विद्यार्थ्यांची प्रगती न झाल्यास मुख्याध्यापकांना नोटीस देण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून सर्व शाळांमध्ये  ‘उन्नती प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकस्तर सुधारण्यात यावा, त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळावे, याकरिता विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यात आली. यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केला आहे. शाळांची पाहणी करुन त्यांची गुणवत्ता तपासणी करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात यासंदर्भात शाळांचा सर्व्हे झाला. त्यानंतर जे विद्यार्थी अजूनही अभ्यासात मागे आहेत, अशा विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्याचे शिक्षक देणार असून नोव्हेंबर महिन्यात पुन्हा शाळांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच पहिली ते आठवीच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार लेखन, वाचन आदींची माहिती असावी यानुसार काही निकष ठरवण्यात आले.
या निकषांच्या आधारे प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांची प्रगती निश्चित करण्यात आली. शिक्षकांनी कोणताही विद्यार्थी अप्रगत राहू नये, सर्व विद्यार्थी निकषाप्रमाणे प्रगत व्हावेत, याकडे लक्ष देण्याचे आदेश महापालिकेने दिलेल्या परिपत्रकात देण्यात आले. त्यानुसार डिसेंबरपर्यंत शिक्षकांना मुदत देण्यात आलेली आहे. त्य़ानंतरही विद्यार्थी अप्रगत असतील तर मात्र अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीसा देण्यात येणार आहेत. दिलेल्या मुदतीनंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी तपासणी टीम तयार केली जाणार आहे. या टीममध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश करीत त्यांनाही या गुणवत्ता वाढ प्रक्रीयेत सहभागी करुन घेणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला अक्षर अंक ओळख, वाचन, लेखन, गणिती क्रिया यांचे ज्ञान असावे, यासाठी उन्नती प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल. यात शून्य ते चार अशा क्रमानुसार विद्यार्थ्यांचा गुणवत्ता स्तर तपासला जाईल. यानुसार शून्य स्तर असलेल्या विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद शिक्षक ठेवणार आहेत. 
प्रा. सोनाली गव्हाणे – सभापती, शिक्षण समिती महापालिका पिंपरी – चिंचवड
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button