breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्त भाजपच्या दावणीला बांधलेला बैल – दत्ता साने

  • भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध
  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केला संताप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भोसरीतील नवीन रुग्णालय खासगी तत्वावर चालविण्यात येणार आहे. यामुळे रुग्णालयातील उपचार महागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना येथील आरोग्य सुविधा परवडणार नाही. तरीही, आयुक्त दोन्ही आमदारांच्या इशा-यावर नाचत आहे. एकीकडे जगताप आणि दुसरीकडे लांडगे या दोन्ही आमदारांनी दादागिरी लावली आहे. आयुक्त स्वतःच्या पातळीवर नागरी हिताचा निर्णय घेण्याऐवजी सत्ताधा-यांच्या दबावाखाली येऊन निर्णय घेत आहेत. हे आयुक्त कसले, हे तर भाजपच्या दावणीला बांधलेला बैल आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी संताप व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीत नव्याने बांधलेले रुग्णालय चालविण्याची पालिकेची क्षमता असताना ते खासगी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे भाजपच्या आमदार आणि पदाधिका-यांचा हात आहे. भाजप पदाधिकारी टक्केवारीच्या राजकारणात गुंतले आहेत. त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रुबी एल केअर सेंटर खासगी संस्थेला चालविण्यास दिले आहे. मात्र, तेथील अनुभव अत्यंत क्लेशदायक आहे. सर्वसामान्य रुग्णांना त्याठिकाणी उपचार घेणे परवडत नाही. असे असताना भोसरीतील पालिकेचे रुग्णालय खासगी तत्वावर देण्याचा अट्टाहास केला जात आहे. प्रशासनाने तसा ठराव तयार केला आहे. कोणाच्या दबावाखाली येऊन आयुक्तांनी हा ठराव तयार केला?. स्थानिक आमदारांना या माध्यमातून त्यांचे नवीन दुकान चालू करायचे आहे का?. आयुक्तांनीही याला संमती देऊन ते भाजपचे ब्रँड अँम्बेसिडर आहेत, हे दाखवून दिले आहे. सत्ताधा-यांच्या तालावर ‘ढोलकी नृत्य’ करण्याचे आयुक्तांनी सोडून द्यावे, आणि नागरिकांच्या हिताचे स्वावलंबी निर्णय घ्यावे, अशी सूचना साने यांनी केल्या आहेत.

महापालिकेची आरोग्य वैद्यकीय सुविधा ही मुलभूत सुविधा आहे. गोरगरीब, झोपडपट्टीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सुविधा माफक दरात असावी. वायसीएमसह तालेरा, जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भोसरी, आकुर्डी, यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील आदी रुग्णालये नागरिकांना सुविधा पुरवत आहेत. हे सर्व रुग्णालये मनपामार्फत चालविली जातात. तर, वायसीएममधील रुबी एल केअर हे रुग्णालय खासगी तत्वावर चालविले जाते. त्यामध्ये रुग्णांशी अत्यंत उध्दटपणे वर्तन केले जाते. राज्य शासनाच्या वैद्यकीय योजनांचा रुग्णांना लाभ दिला जात नाही. रुग्णांकडे लक्ष दिले जात नाही, असे असताना भोसरीतील रुग्णालय पुन्हा खासगी तत्वावर देण्याचा घाट घातला जात आहे, असेही साने म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button