breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मराठा आरक्षणावरुन राजीनामा देण्याबाबत पिंपरी चिंचवडचे खासदार, आमदार चिडीचूप

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मराठा आरक्षणासाठी मावळ, शिरुर लोकसभा आणि चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या आंदोलनातून मराठा बांधवाकडून करण्यात आली. परंतू, खासदार, आमदारांनी मराठा समाजातील बांधवानी केलेल्या आवाहनाला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. या लोकप्रतिनिधी राजीनामा देण्याबाबत चिडीचूप भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सकल मराठा समाजाच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागणार आहे. 

सकल मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार बाळा भेगडे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी मावळसह पिंपरी चिंचवडमधील सकल मराठा क्रांती मोर्चातील समाज बांधवाकडून करण्यात आली होती. त्याला कोणताही प्रतिसाद लोकप्रतिनिधींनी दिलेला नाही.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह अन्य मागण्याकरिता मराठा मुक क्रांती मोर्चा राज्यात शांतेत व सनदशील मार्गाने लाखोंचे ५८ मोर्चे काढण्यात आले. परंतु भाजप सरकारने वेळकाढू भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होऊन मुक मोर्च्याचे रुपांतर ठोक मोर्चात झाले. मराठा आरक्षणासाठी समाजातील खासदार, आमदारांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली. त्याला प्रतिसाद देत कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, शिवसेनेचे हेमंत पाटील, राहुल मोटे व कोंग्रेसचे भारत भालके यांनी समाजासाठी पुढे येऊन स्वत:च्या आमदारकीचे राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे सहयोगी  आमदार महेश लांडगे यांनी अद्याप राजीनामे दिलेले नाहीत. त्यामुळे मावळसह पिंपरी चिंचवडच्या सकल मराठा समाजातील बांधवामधून मराठा लोकप्रतिनिधींबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. समाजाने केलेल्या आवाहनाला या लोकप्रतिनिधींनी केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत सकल मराठा क्रांती मोर्चांकडून लोकप्रतिनिधींना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, अशी तिखट भावनाही व्यक्त होवू लागली आहे.

भोसरीच्या आमदारांची व्दिधा मनस्थिती 

सकल मराठा क्रांती ठोक मोर्चांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विविध मार्गाने राज्याच्या कानाकोप-यात  तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत वेळकाढू भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मराठा समाजातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. त्यावेळी अचानक मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाल्यावर भोसरी विधानसभेचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री बदलल्यास भाजपचा पाठिंबा काढणार असल्याची प्रतिक्रिया सरकारनामा वेबसाईटद्वारे दिली. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाच्या पाठिंशी न राहता भोसरीचे आमदार मुख्यमंत्र्याच्या पाठिंबी ठाम राहात असल्याची चर्चा समाज बांधवामध्ये सुरु झाली. ही प्रतिक्रिया अंगलट आल्याचे त्यांच्या लक्षात येताच दुस-या दिवशी त्यांनी मराठा समाजासाठी जीवाचे रान करु, मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिलेल्या उलट सुलट प्रतिक्रियेला सुरुवात झाली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button