breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मध्य रेल्वेची स्थानके ‘वायफाय’मय

१०४ पैकी ९५ स्थानकांवर मार्चपर्यंत सुविधा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १०४ स्थानकांपैकी ९५ स्थानकांवर मार्च २०१९ पर्यंत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. सध्या ७८ उपनगरीय स्थानकांपैकी १७ स्थानकांवर वायफायची सुविधा असून मार्चपर्यंत काही छोटी स्थानके वगळता बहुतेक सर्वच स्थानकांवर ही सुविधा मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

इंटरनेट ही सर्वासाठीच आता दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाची सेवा ठरली आहे. गाणी डाऊनलोड करणे, चित्रपट पाहणे, विविध विषयांची माहिती मिळवणे, एखाद्या ठिकाणाकडे जाणारा रस्ता शोधणे, परिचितांच्या संपर्कात राहणे, यासाठी सर्वच जण इंटरनेटवर अवलंबून असतात.

प्रवाशांना मोफत वायफाय उपलब्ध झाल्यास त्यांचे पैसे वाचतील आणि इंटरनेटवरील माहितीही विनाअडथळा व वेगाने मिळेल. त्यामुळे देशभरातील ४०० महत्त्वाच्या स्थानकांवर वायफाय सेवा देण्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळात केली होती.

प्रथम पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात रेलटेलच्या साहाय्याने वायफायची सेवा उपलब्ध करण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवरही सुविधा देण्यात आली. सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वाशी, बेलापूर, चेंबूर, वडाळा रोड, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस या काही स्थानकांवर वायफाय सुविधेचा लाभ प्रवासी घेत आहेत.

कल्याण स्थानकात तर १४ हजारपेक्षा जास्त प्रवाशांकडून वायफायचा वापर होत आहे. त्यापाठोपाठ ठाणे, कुर्ला, सीएसएमटी स्थानकांतही प्रवाशांकडून वायफायचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे.

९५ स्थानकांपैकी ७८ उपनगरीय स्थानके ही मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर तसेच दिवा-वसई-विरार-पनवेल, नेरूळ ते खारकोपर मार्गावर येतात. यातील १७ स्थानकांवर सध्या वायफाय आहे.

लहान स्थानकांना वगळले

कर्जत, खोपोली, कसारा मार्गावर काही स्थानके छोटी असून त्यांची प्रवासी संख्या ही अगदीच नगण्य आहे. त्यामुळे त्या स्थानकांत वायफाय देऊन काही फायदा नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button