breaking-newsआंतरराष्टीय

मंदिर विध्वंसप्रकरणी इम्रान खान यांचे चौकशीचे आदेश

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू मंदिरात काही समाजकंटकांनी तोडफोड केली असून मूर्ती आणि पवित्र ग्रंथ पेटवून दिले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खारीपूर जिल्ह्यातील कुंब येथे मागच्या आठवडयात ही घटना घडली.

तोडफोड केल्यानंतर आरोपी पसार झाले. इम्रान खान यांनी सिंध प्रांताच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन दोषीं विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. सिंध प्रांताच्या सरकारने दोषींवर जलद आणि निर्णायक कारवाई करावी. आरोपींचे कृत्य कुराणमधल्या शिकवणीच्या बिलकुल विरोधात आहे असे इम्रान यांनी म्हटले आहे.

सिंध मधल्या हिंदू समाजाने अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांची भेट घेतली होती. मंदिराच्या आसपास घरे असल्यामुळे विशेष देखभाल करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला नियुक्त केले नव्हते. तोडफोडीच्या घटनेनंतर परिसरातील हिंदुंनी निषेध आंदोलन केले.

हिंदू मंदिराच्या संरक्षणासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करावी अशी मागणी पाकिस्तान हिंदू परिषदेचे सल्लागार राजेश कुमार हरदासानी यांनी केली. या हल्ल्यामुळे हिंदू समाजामध्ये अस्वस्थतता निर्माण झाली आहे. धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्यासाठी असे हल्ले यापूर्वीही झाले आहेत असे हरदासानी यांनी सांगितले. आम्ही हल्लेखोरांचा शोध घेत आहोत. पण अद्यापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. कुठल्याही गटाने या तोडफोडीची जबाबदारी स्विकारलेली नाही असे पोलिसांनी सांगितले. मुस्लिम बहुल पाकिस्तानमध्ये हिंदुंची लोकसंख्या फक्त दोन टक्के आहे. बहुसंख्य हिंदू हे सिंध प्रांतात रहातात. या प्रांतातील हिंदुंनी कट्टरतवाद्यांकडून छळ होत असल्याची तक्रार यापूर्वीही केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button