breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी रुग्णालयात शहरातील नागरिकांना मिळणार मोफत सुविधा

  • रुग्णालयावर निरीक्षण ठेवण्यासाठी स्वतंत्र कमिटी राहणार
  • वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी दिली माहिती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भोसरीतील मनपा रुग्णालयाचे खासगीकरण झाले तरी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध राहतील. त्यापोटी महापालिका खासगी संस्थेला प्रती वर्षी 16 कोटी रुपये अदा करेल. त्या बदल्यात नागरिकांना वायसीएम रुग्णालयात जे उपचार उपलब्ध नाहीत. ते अत्यावश्यक उपचार सहज उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

भोसरीतील रुग्णालय खासगी तत्वावर चालविण्यासाठी देण्याला जोरदार विरोध होत असताना याबाबत डॉ. रॉय यांना विचारले असता त्यांनी रुग्णालय चालविण्यासाठीच्या अटी-शर्ती, सोयी-सुविधांबाबत माहिती दिली. हे रुग्णालय चालविण्यासाठी वार्षिक 20 कोटीच्या आसपास खर्च येईल. खासगी संस्था चालवित असली तरी या रुग्णालयात पिंपरी-चिंचवडमधील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांना मोफत सुविधा मिळणार आहेत. त्यांच्यासाठी 50 टक्के खाटा आरक्षीत राहतील. यापोटी आपण वर्षिक 16 कोटी रुपये अदा करणार आहोत. शहराबाहेरील रुग्णांना देखील सवलतीत उपचार मिळतील. मात्र, त्यासाठी शासकीय दाखल्यांच्या अटी बंधनकारक आहेत. अटींची पुर्तता केल्यास त्यांना सुध्दा महागड्या सुविधा माफक दरात उपलब्ध होतील, असे डॉ. रॉय यांनी सांगितले.

रुग्णालयात संबंधित संस्थेला इंडियन पब्लिक हेल्थच्या मार्गदर्शक तत्वानुसार मनुष्यबळ उपलब्ध करावे लागणार आहे. पॅथॉलॉजी किंवा लॅबॉरेटरी हे विभाग एनएबीएल प्रमाणित व रुग्णालय हे एनएबीएच प्रमाणित असणे आवश्यक आहे. ओटी, डायलेसीस, डायग्नोस्टीक, रेडिओलॉजीस, सीएसएसडी इत्यादी विभागांकरिता आवश्यक सर्व उपकरणे खरेदी करावी लागणार. अंतररुग्ण तसेच बाह्य रुग्ण विभागासाठी संगणकीकरण व रुग्णालयांतर्गत डाटा मनपाच्या सर्वरला संलग्न असणार आहे. 24 तास आठवड्याचे सात दिवस रुग्णसेवा पुरविणे संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. अशा अटी व शर्ती ठेकेदार संस्थेला घालण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. रॉय यांनी दिली.

डिलिव्हरी, लहान मुलांचे उपचार नाहीत

भोसरी रुग्णालय अपोलो रुग्णालयाच्या धरतीवर चालविण्यात येणार आहे. अपोलो रुग्णालयातील व्यवस्थापकीय यंत्रणा ज्या पध्दतीने कामकाज करत आहे. ती पध्दत या रुग्णालयात राबविण्यात येणार आहे. ज्या सुविधा वायसीएम रुग्णालयात मिळत नाहीत. ते महागडे उपचार माफक दरात या रुग्णालयामध्ये सहज मिळतील. मात्र, डिलिव्हरी आणि लहान मुलांचे उपचार या रुग्णालयामध्ये उपलब्ध राहणार नाहीत. या रुग्णालयावर निरीक्षण ठेवण्यासाठी पालिकेतील वैद्यकीय विभागाची स्वतंत्र कमिटी स्थापन करावी लागणार आहे, अशी माहिती डॉ. रॉय यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button