breaking-newsक्रिडा

भारतीय तिरंदाजांच्या मार्गात पाकिस्तानचा ‘हवाई’ अडथळा, खेळाडू विश्वचषकाला मुकले

पाकिस्तानी बालाकोट भागात भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर, पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली आहे. पाकिस्तानच्या या धोरणाचा फटका भारताच्या तिरंदाजांना बसला आहे. कोलंबियातील Medellin शहरात रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला भारतीय खेळाडू मुकले आहेत. पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्यामुळे भारतीय खेळाडूंचं विमान वेळेत उड्डाण करु शकलं नाही.

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. काही दिवसांपूर्वी हे निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले होते, मात्र अजुनही ही बंदी पूर्णपणे उठवण्यात आलेली नाही. दिपीका कुमारी, बोम्बायला देवी, अतानू दास, तरुणदीप राय, अभिषेक वर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह २३ भारतीय खेळाडूंचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार होता. दिल्ली-अॅमस्टरडॅम-बोगोटा हा भारतीय खेळाडूंच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. यानंतर बोगोटावरुन Medellin शहरात जाण्यासाठी दुसऱ्या विमानाचं बुकींग करण्यात आलं होतं.

स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच, त्यांना विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, पाकिस्तानातील हवाई हद्द बंद असल्यामुळे विमान दोन तास उशीरा असल्याचं सांगितलं. खेळाडूंनी भारतीय तिरंदाजी संघटनेच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. संघटनेने खेळाडूंसाठी दुसऱ्या मार्गाची तिकीटं बुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर विमानांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे अखेरीस तिरंदाजी संघटनेला भारतीय खेळाडूंना माघारी बोलावणं भाग पडलं.

याविषयी तिरंदाजी संघटनेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी बंद असल्याची माहिती अधिकाऱ्यांना नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समजतंय. महत्वाच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी हुकल्यामुळे खेळाडू आता पुण्यातील राष्ट्रीय शिबीरात परतणार आहेत. जून महिन्यात नेदरलँड मध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू तयारी करणार आहेत. विश्व अजिंक्यपद स्पर्धेला २०२० टोकियो ऑलिम्पिक कोटा देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button