breaking-newsक्रिडा

भारताकडून पराभूत झाल्याने झोप उडाली – सर्फराज अहमद

नवी दिल्ली- आशिया चषक स्पर्धेत भारताकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर मला झोप लागलेली नाही, असे वक्‍तव्य पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने केले आहे. आशिया चषक स्पर्धेत सुमार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला अबूधाबीत झालेल्या सामन्यात पराभूत करताना बांगलादेशच्या संघाने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले होते. त्याआधी या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सलग दोनवेळा भारताकडून पराभूत झाला होता.

आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानची कामगिरी चांगली झालेली नाही. भारताविरुद्ध पाकिस्तानने अतिशय सुमार दर्जाचा खेळ केला. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने माध्यमांशी संवाद साधला. मी गेले सहा दिवस झोपलेलो नाही, असे सांगितल्यास कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. पराभव झाल्यापासून मी अस्वस्थ आहे, असे सर्फराज अहमदने सांगितले.

यावेळी त्याला पाकिस्तानच्या पराभवाचे कारण विचारण्यात आले. त्यावर भाष्य करताना कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दबाव असतोच, असे सांगून सर्फराज म्हणाला की, कोणत्याही संघाच्या कर्णधारावर दडपण असतेच. जेव्हा तुमची कामगिरी चांगली होत नसते, संघ लौकिकाला साजेशा खेळ करत नसतो, तेव्हा दबाव असतोच. परंतु या दडपणामुळे आम्ही पराभूत झालो असे म्हणता येणार नाही. भारतीय संघाकडून पराभूत झाल्यानंतर मला गेले सहा दिवस झोप आली नाही. तुम्ही सातत्याने जिंकू शकत नसता. मात्र पराभवाचा सामना करणे सोपे नाही हे मला चांगलेच समजले. हेच जीवन आहे, असे म्हणत सर्फराजने पराभवामुळे तो किती व्यथित झाला आहे हे माध्यमांसमोर मांडले.

आशिया चषक स्पर्धेतील गटसाखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 162 धावांमध्ये आटोपला. यानंतर भारताने केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ बाद फेरीत आमनेसामने होते. यावेळी पाकिस्तानने 50 षटकांत 7 बाद 237 धावा उभारल्या. हे आव्हान भारताने केवळ एक गडी गमावून पार केले.

या दोन पराभवानंतरही पाकिस्तानला अंतिम फेरी गाठण्याची संधी होती. त्यासाठी अखेरच्या सुपर फोर सामन्यात त्यांना बांगला देशवर मात करणे आवश्‍यक होते. परंतु या सामन्यात पाकिस्तानचा संघ बांगलादेशकडून पराभूत झाला. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानच्या अशा सुमार कामगिरीमुळे त्यांच्या संघावर सर्वच स्तरातुन टीका होत असताना आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणाही करण्यात आली आहे.

संयुक्‍त अरब अमिरातीत झालेली स्पर्धा म्हणजे पाकिस्तानसाठी घरच्या मैदानावरील स्पर्धा असते. या स्पर्धेत पराभूत होण्याची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर पाकिस्तान संघाला लगेचच ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा दौरा जगातील कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असतो. त्यामुळेच सर्फराज अहमदवर आणखीनच दडपण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button