breaking-newsमहाराष्ट्र

भाजपकडून सेनेच्या मनधरणीचा प्रयत्न; विधान परिषदेचे उपसभापती पद देण्याची तयारी

नागपूर – शिवसेनेसोबतचे ताणले गेलेले संबंध आणि दोन्ही पक्षात निर्माण झालेले दुरावा कमी करण्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती पद देऊन शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती माणिकराव ठाकरे यांची मुदत याच महिन्यात संपत आहे. १६ जुलै रोजी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर सभागृहात भाजप- शिवसेनेचे संख्याबळ वाढणार असून या बहुमताच्या जोरावर शिवसेनेचा उपसभापती बसविण्याचे भाजपने ठरवले आहे. मात्र, भाजपच्या या प्रयत्नांना शिवसेना नेमका काय प्रतिसाद देते हे येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकीनंतर विधान परिषदेत भाजप हा पाहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे. या संख्याबळाच्या आधारे भाजप उपसभापती पदावर दावा सांगणार आहे. माणिकराव ठाकरे यांची मुदत संपत आल्याने उपसभापती पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. अर्थात  ही प्रक्रिया विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात होणार असून त्यावेळी सेनेला उपसभापती पद देण्याची पक्षाची तयारी आहे. त्यापूर्वी या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे आणखी एक उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करावेत अशी पक्षाची भूमिका असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सोमवारी दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप विधान परिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची माहितीही या मंत्र्याने

१६ जुलैला निवडणूक

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १६ जुलैला नागपूरमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवाराला निवडून येण्यासाठी २५ मते आवश्यक आहेत. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, काँग्रेस- राष्ट्रवादी दोघांचे मिळून तीन उमेदवार सहज निवडून येऊ  शकतात. पण ११ जागांसाठी १२ उमेदवार  रिंगणात उतरल्यास निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेनेकडे अतिरिक्त मते असून  १२उमेदवार रिंगणात उतरल्यास आपल्या अतिरिक्त मतांचे वजन सेना कोणाला देते हे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button