breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेळगावातील स्मशानात पार पडला आंतरजातीय विवाह

बेळगाव – अंत्यसंस्काराला स्मशानात लोक जमले होते, मृतदेह चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला, तर दुसरीकडे विवाहाची मंगलाष्टके सुरू होती. कोणत्या चित्रपटातील अथवा कोणत्या वाहिनीवरील मालिकेतील हा प्रसंग नव्हे तर बेळगावच्या सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत एका ठिकाणी अंत्यसंस्कार सुरू होता, तर दुसरीकडे विवाह सोहळा होत होता. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमांतर्गत स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला. 

मानव बंधुत्व संघटनेच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी म्हणून आमदार सतीश जारकिहोळी यांच्या आणि मानव बंधुत्व संघटना यांच्या पुढाकाराने चक्क स्मशानात आंतरजातीय विवाह पार पडला. विवाहाला स्वामीजींनीही उपस्थिती दर्शवली होती. सोपान बाळकृष्ण जांबोटी (रा. तीर्थकुंडये) या दलित युवकाचा हिरेबागेवाडी येथील रेखा चंद्रप्पा गुरवण्णवर या लिंगायत तरुणीशी आंतरजातीय विवाह स्मशानात पार पडला.

आमदार जारकिहोळी यांनी नवदाम्पत्याला पन्नास हजार रुपये रोख आहेर देऊन त्यांचे अभिनंदन केले. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारने तीन लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार जारकिहोळी यांनी सांगितले.

उपस्थित मंडळींनी अक्षता टाकून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही आमदार जारकिहोळी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मशानात वास्तव्य करून उपाहार आणि भोजनही केले होते. आज झालेला स्मशानभूमीतील आंतरजातीय विवाह मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. माणसाचा अखेरचा प्रवास जेथे संपतो, तेथेच नवजीवनाचा प्रारंभ करण्याचे धाडस दाखवणाऱ्या वधू-वरांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button