breaking-newsपुणे

बेलबाग चौक परिसरात स्तनपान कक्ष

  • गणोशोत्सवात नवजात बालके आणि मातांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात शहरात येणाऱ्या भाविकांमध्ये लहान मुलांना घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या मोठी असते. गर्दीच्या ठिकाणी लहान बाळाला स्तनपान देण्याची गरज भासली तर महिलांची गैरसोय होते. ही समस्या लक्षात घेऊन कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२१ व्या वर्षी श्रीकृष्ण जयंती निमित्त शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्षाचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला.

शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सहायक आयुक्त राजेश चव्हाण, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, डॉ. शंकरराव तोडकर, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांना बाळाला स्तनपान देण्यासाठी सोय उपलब्ध करुन देणे ही उपयुक्त व्यवस्था असल्याचे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. दिलीप देशमुख म्हणाले,की धार्मिक संस्थांना शिशु स्तनपान सुविधेबद्दल केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टने ही सुविधा उपलब्ध करुन दिली. ट्रस्टचे हे काम अभिनंदनास पात्र आहे. पुणे शहरात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे इतर मंदिरांनी आणि ट्रस्टनी या उपक्रमाचे अनुकरण करावे. डॉ. शंकरराव तोडकर म्हणाले,की आईच्या दुधामुळे नवजात बालकांचे ७५ टक्के आजार नाहिसे होतात. नोकरी करणाऱ्या अनेक महिला बाळाचे स्तनपान लवकर बंद करतात. मात्र बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान अत्यावश्यक आहे.

अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ दत्तमंदिराजवळ बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील गर्दीमुळे महिलांना अनेक अडचणी येतात. महिलांकडे लहान मूल असेल तर त्यांना स्तनपान देणे ही गोष्ट अशक्य असते. अनसूया कक्षाच्या माध्यमातून अशा महिलांची अडचण संपणार आहे. शिरीष मोहिते म्हणाले,की शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मंदिरामध्ये नवजात बालकांसह येणाऱ्या महिलांना शिशुंना स्तनपान करणे शक्य व्हावे यासाठी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर अनसूया कक्षाची सोय करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button