क्रिडा

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : हालेप, जोकोविच तिसऱ्या फेरीत दाखल

पॅरिस – रुमानियाची अग्रमानांकित सिमोना हालेप, युक्रेनची चतुर्थ मानांकित एलिना स्विटोलिना, झेक प्रजासत्ताकाची आठवी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हा, तसेच जपानची 21वी मानांकित नाओमी ओसाका, 25वी मानांकित ऍना कॉन्टाव्हेट, 26वी मानांकित बार्बरा स्ट्रायकोव्हा आणि 31वी मानांकित मिहाएला बुझार्नेस्क्‍यू या महिला मानांकितांसह बिगरमानांकित कॅटरिना सिनियाकोव्हाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली.

पुरुष एकेरीत सर्बियाचा 20वा मानांकित नोव्हाक जोकोविच, स्पेनचा दहावा मानांकित पाब्लो कॅरेनो बस्टा, स्पेनचा 13वा मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऑगट व झेक प्रजासत्ताकाचा 17वा मानांकित टॉमस बर्डिच या मानांकितांसह मार्को चेचिनाटोने व ज्युलियन बेनेट्यू या बिगरमानांकितांनीही आकर्षक विजयाची नोंद करताना तिसरी फेरी गाठली. तसेच स्पेनच्या तिसाव्या मानांकित फर्नांडो वेर्दास्कोनेही एकतर्फी विजयासह तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
महिला एकेरीत अग्रमानांकित सिमोन हालेपने अमेरिकेच्या बिगरमानांकित ऍलिसन रिस्केविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना 2-6, 6-1, 6-1 अशा झुंजार विजयासह तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये तब्बल 16 नाहक चुका करणाऱ्या हालेपने नंतर आपला खेळ उंचावला आणि रिस्केला नामोहरम केले. आता हालेपसमोर अमेरिकेच्या टेलर टाऊनसेन्डचे आव्हान आहे.

चतुर्थ मानांकित एलिना स्विटोलिनाने मात्र स्लोव्हाकियाच्या बिगरमानांकित व्हिक्‍टोरिया कुझमोव्हाची झुंज 6-3, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मोडून काढताना तिसरी फेरी गाठली. स्विटोलिनासमोर आता रुमानियाच्या 31व्या मानांकित मिहाएला बुझार्नेस्क्‍यूचे आव्हान आहे. दुसऱ्या फेरीच्या आणखी एका लढतीत बुझार्नेस्क्‍यूने स्वीडनच्या बिगरमानांरिक रेबेक्‍का पीटरसनचा 6-1, 6-2 असा फडशा पाडताना आगेकूच केली. झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाने स्पेनच्या लारा आरुआबारेनाचा 6-0, 6-4 असा सहज पराभव करताना अखेरच्या 32 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. माजी विम्बल्डन विजेत्या क्‍विटोव्हासमोर तिसऱ्या फेरीत इस्टोनियाची 28वी मानांकित ऍनेट कॉन्टाव्हेट किंवा रुमानियाची अलेक्‍झांड्रा डल्गेरू यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे.

बर्डिचचा चार्डीवर संघर्षपूर्ण विजय 
झेक प्रजासत्ताकाच्या 17व्या मानांकित टॉमस बर्डिचने फ्रान्सच्या बिगरमानांकित जेरेमी चार्डीला पराभूत करीत तिसरी पेरी गाटली. परंतु त्यासाठी त्याला 7-6, 7-6, 1-6, 5-7, 6-2 अशी साडेतीन तासांहून अधिक काळ लढत द्यावी लागली. दुखापतीतून पुनरागमन करीत असलेल्या विसाव्या मानांकित नोव्हाक जोकोविचने मात्र स्पेनच्या बिगरमानांकित जॉमे मुनारचा प्रतिकार 7-6, 6-4, 6-4 असा मोडून काढताना तिसऱ्या फेरीतही आपले आवंहान कायम राखले. दहाव्या मानांकित पाब्लो कॅरेनो बस्टाने अर्जेंटिनाच्या फेडरिको डेल्बोनिसचा कडवा प्रतिकार 7-6, 7-6, 3-6, 6-4 असा संपुष्टात आणताना तिसरी पेरी गाठली. तेराव्या मानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऑगटने कोलंबियाच्या सॅंटियागो गिराल्डोचा 6-4, 7-5, 6-3 असा पराभव करताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button