क्रिडा

फिफा विश्‍वचषक: क्रोएशियाची हॅटट्रिक, आईसलॅंड स्पर्धेबाहेर

रोस्टोव्ह ऑन डॉन: अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखणाऱ्या आईसलॅंडच्या झुंजार संघाने अखेरच्या ड गटसाखळी सामन्यात क्रोएशियालाही जबरदस्त लढत दिली. परंतु सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर आईसलॅंडचे आव्हान 2-1 असे मोडून काढताना क्रोएशियाने फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली.

याआधीच्या दोन साखळी सामन्यांमध्ये अर्जेंटिना आणि नायजेरियावर मात करणाऱ्या क्रोएशियाने सलग तिसऱ्या विजयामुळे हॅटट्रिक साधली. तसेच अर्जेंटिनाचे भवितव्य निश्‍चित करणाऱ्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाक्रोएशियाने सर्वाधिक 9 गुणांची कमाई करून ड गटातून पहिल्या क्रमांकाने उपउपान्त्यपूर्व फेरीही गाठली. आता बाद फेरीतील येत्या रविवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात क्रोएशियासमोर डेन्मार्कचे कडवे आव्हान आहे.

त्याआधी आईसलॅंडने क्रोएशियाच्या चढाया रोखताना पूर्वार्धात सुरेख कामगिरी केली होती. मध्यंतराला गोलशून्य बरोबरी राखताना आईसलॅंडने अनपेक्षित निकालाचीही तयारी केली होती. परंतु 53व्या मिनिटाला मिलान बादेल्जने विद्युतवेगाने लक्ष्यवेध करून क्रोएशियाचा पहिला गोल नोंदविल्यामुळे ही कोंडी फुटली. आईसलॅंडने लगेचच प्रतिआक्रमण करीत या गोलची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात आल्फ्रेड फिनबोगासेन आणि एमिल हॉलफ्रेडसन यांना यलो कार्डचे बक्षीसही मिळाले.

अखेर 76व्या मिनिटाला आईसलॅंडच्या प्रयत्नांना यश मिळाले. सिगुर्डसनच्या फटक्‍यावर क्रोएशियाच्या डेजान लव्हरेनने चेंडू हाताने रोखल्यामुळे आईसलॅंडला बहुमोल पेनल्टी किक मिळाली. सिगुर्डसनने नायजेरियाविरुद्ध पेनल्टी किक बाहेर मारली होती. या वेळी मात्र कोणतीही चूक न करता त्याने चेंडू गोलजाळ्याच्या वरच्या बाजूला मारत लक्ष्यवेध केला व आईसलॅंडला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या बरोबरीमुळे क्रोएशियाचे खेळाडू वैतागले होते. परंतु आईसलॅंडला फिफा विश्‍वचषक स्पर्धेत पहिल्यावहिल्या विजयाची स्वप्ने पडू लागली होती.

अर्थात तसे घडायचे नव्हते. मैदानावरील पंच निर्धारित 90 मिनिटांची वेळ संपल्याची शिट्टी मारण्याच्या तयारीत असताना इव्हान पेरिसिकने क्रोएशियाचा विजयी गोल नोंदवीत आईसलॅंडचा हृदयभंग केला. यावेळ मिलान बादेल्जने दिलेल्या अचूक पासवर पेरिसिकने आईसलॅंडचा गोलरक्षक हॅन्स हॉल्डरसनला सहज चकविले. आता निझनी नोव्हगुड स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या उपउपान्त्यपूर्व लढतीत हीच विजयी घोडदौड कायम राखण्याचे आव्हान क्रोएशियासमोर आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button