प्रिती बारिया हत्या प्रकरणात दोन आरोपींना फाशी
भंडारा: भंडाऱ्यातील प्रिती बारिया हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना आज फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भंडारा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी हा निर्णय दिला. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात घुसून तिघांवर केलेल्या हल्ल्यात प्रिती बारिया यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन मुलांना कायमचे अपंगत्त्व आले. ही घटना 30 जुलै 2015 ला घडली होती. या प्रकरणातले दोषी आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
चोरट्यांनी रुपेश बारिया यांच्या पत्नी प्रिती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार केले होते. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बारिया यांच्यावर वार केल्यानंतर चोरट्यांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि 3 लाख 20 हजारांची रोकड लंपास केली. बारिया यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी आमीर शेख आणि सचिन राऊत या दोघांनीही म्हाडा कॉलनी येथील रविंद्र शिंदे यांच्या घरीही चोरी केली होती. त्यांच्या घरात शिरतानाही या दोघांनीही एसी दुरुस्तीचेच कारण सांगितले होते. यावेळी या दोघांनी शिंदे यांच्या घरी एकटीच असलेली त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यात हातोडीने वार केले होते. त्यानंतर शिंदे यांच्या घरातले दागिने, लॅपटॉप आणि एटीएम कार्डही चोरले होते.
रविंद्र शिंदे यांच्या घरातून चोरलेले एटीएम कार्ड वापरून या दरोडेखोरांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पोलिसांना या चोरट्यांचा तपास लागला