breaking-newsमहाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसलाच तोटा होणार – रामदास आठवले

श्रीरामपूर – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर जनता नाही.,  त्यांनी स्थापन केलेली वंचित बहुजन विकास आघाडी ही वंचितांनाच सत्तेपासून दूर ठेवणारी आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केली.

कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथील मरण पावलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची आठवले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. पीडित कुटुंबाला पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री निधीतून आणखी मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर आठवले हे सरकारी विश्रामगृहावर वार्ताहरांशी अनौपचारिकरीत्या बोलत होते.

आठवले म्हणाले, वंचित आघाडी हा तिसरा पर्याय होऊ  शकतो. वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. या आघाडीत सर्व नेतेच असून जनता आमच्यासोबत आहे. आंबेडकर यांनी निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. सत्तेत येण्यासाठी त्यांनी एमआयएम बरोबर युती केली. मात्र त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे, असे ते म्हणाले.

पाच राज्यांतील निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव हा पंतप्रधान मोदींचा पराभव नसून तो राज्यपातळीवरील समस्यांमुळे झाला आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी टक्कर दिली. जनतेला सत्तेविरोधात नेहमी बदल हवा असतो, त्यामुळे तेथील निकाल हा मोदी विरोधात नाही. या निकालानंतर भाजप अधिक सक्रिय होणार असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेणार आहे. सरकार आणखी प्रयत्न करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा त्यांनी केला. राज्यात शिवसेना व भाजपमध्ये युती होणार आहे. त्यादृष्टीने जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ही बोलणी सुकर व्हावी, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहे. ते एकत्र आल्यानंतर रिपब्लिकन पक्षासाठी जागा सोडण्यात येईल.

धुळे, नगर येथे युतीची सत्ता आली. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आली तरी आगामी निवडणुकीत काही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, मराठा आरक्षण कोर्टात टिकेल, असा मला विश्वास आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सकारात्मक आला. आरक्षणाचा प्रश्न कायदा केल्याशिवाय सुटणार नाही. आतापर्यंत अनेक वेळा उच्चवर्णीयांना आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, पण ते न्यायालयात टिकले नाही, त्यामुळे या संदर्भात केंद्राने कायदा करावा, अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणाच्या धर्तीवर वेगळय़ा विदर्भाची मागणी कायम होते, त्यामुळे याचाही सरकारने विचार करावा, अशी मागणी आपण केली असल्याचे ते म्हणाले.

कारेगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आहे. कारेगाव प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. अहवाल प्राप्त होताच आरोपीस अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, राजाभाऊ  कापसे, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, सुनील शिरसाठ, भीमा बागूल, रमादेवी धिवर आदी उपस्थित होते.

युती झाल्यास मुंबईतून निवडणूक लढविणार

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये लोकसभा निवडणुकीत युती व्हावी म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत. जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. सेना-भाजपाची युती झाली तर आपण लोकसभेची मुंबईतून निवडणूक लढवू, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button