breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पोलीस भरती परीक्षेच्या घोटाळ्यात दोन पोलिसांनाच अटक

  • न्यायालयाने सुनावली 25 मेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे – पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी दोन पोलिसांनाच वानवडी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांनाही 25 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ओंकार साने यांनी दिला आहे.

पोलीस हवालदार नामदेव बाबुराव ढाकणे (37, रा. आयआरबी औरंगाबाद, हरसुल जेल परिसर मुळ रा. जालणा) आणि पोलीस शिपाई शुक्राचार्य बबन टेकाळे (27, रा. जालना, मुळ रा. बुलढाणा) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी या प्रकरणात गिरीश बापूसाहेब अवधूत (32, रा. पिंपळेनिलख, पुणे, मूळ रा. विश्रामबाग, सांगली) आणि स्वप्निल दिलीप साळुंखे (32, विशालनगर, जगताप डेअरी, मूळ रा. विश्रामबाग सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे.

याप्रकरणी प्रवीण दत्तात्रय भटकर (रा. बावधन), भूषण निरंजनराव देऊलकर आणि तेजस राजेंद्र नेमाडे या तिघांवर गुन्हा दाखल आहे. पोलीस तिघांचा शोध घेत आहे. 21 एप्रिल ते 22 एप्रिल 2018 दरम्यान चैत्रबन विश्रामगृह, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 2 येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात राखीव पोलीस बल गट क्रमांक-2 चे पोलीस निरीक्षक नितीकांत पराडकर (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-2मध्ये एकूण 83 सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 12 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेकरिता आवश्‍यक असलेल्या ओएमआर (ऑप्टिकल मार्क रिकॉग्नेशन) शीट पुरवणे, तसेच तपासणी करण्याचे काम बावधन येथील प्रवीण भटकर याच्या मे. इटीएच लिमिटेड कंपनीकडे देण्यात आले होते. दरम्यान, भरती प्रक्रिया कालावधीमध्ये शारीरिक चाचणी, तसेच इतर परीक्षांमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा 21 एप्रिल रोजी कवायत मैदानावर घेण्यात आली. 3 हजार 730 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रवीण भटकर आणि इतर चार आरोपींकडे देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (22 एप्रिल) रोजी चार वाजता गोपनीय पद्धत्तीने निकाल दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये आरोपींनी 32 उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत फेरबदल केल्याचे समोर आले. याप्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी दोघांनाही पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button