breaking-newsमहाराष्ट्र

पुराने वेढले, झाडाने तारले; गडचिरोलीत बसमधील २५ प्रवाशांची सुखरूप सुटका

विदर्भात सध्या मुसळधार पावसाने कहर केला असून गडचिरोली जिल्ह्यातील नद्या-नाल्यांवरील छोटे-मोठे पुलही पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, सोमवारी एक एसटी बस एका छोट्या नाल्यावरील पुलावरुन जात असताना नाल्यावरुन वेगाने वाहत असलेल्या पाण्यामुळे थेट पाण्यात गेली आणि वाहू लागली. मात्र, नाल्यात मध्यभागी असलेल्या एका झाडाला ती अडकली. त्यानंतर, परिसरातील लोकांनी तत्काळ तिकडे धाव घेऊन बसमधील २५ प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

परिसरातील मुसळधार पावसामुळे येथील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी परिसरात सर्व रस्ते व नाल्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हैदराबाद-गडचिरोली एसटी बस अलापल्ली-सिरोंचा मार्गावरील आलापल्लीपासून ३० किमी अंतरावरील नदीगाव जवळील झिमेला नाल्याजवळ पोहोचली. मुसळधार पावसामुळे झिमेला नालाही दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पुराचे पाणी यावरील पुलावरून जात आहे. मात्र, पुलावरून पाणी वाहत  असल्याचे दिसत असतानाही बस  चालकाने तशीच बस पुढे नेली. यावेळी चालकाला पुलही दिसत नव्हता त्यात पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने बसचे नियंत्रण जाऊन ती थेट नाल्याच्या पात्रात पडली. या घटनेनंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आरडा-ओरडा करायला सुरुवात केली.

दरम्यान, वाहत जाऊन काही अंतरावरील झाडाला ही बस अडकली. यावेळी काठावरील स्थानिक नागरिकांनी हे दृश्य पाहिले आणि त्यांनी पळापळ करून एक ट्रॅक्टर आणि मोठा दोरखंड मागवला. दोरखंडाचे एक टोक ट्रॅक्टरला बांधून दुसरे टोक पाण्यात अडकलेल्या बसपर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर एकेका प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर जवळपास १ तासाच्या अथक परिश्रमानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, बस अजूनही पाण्यातच अकडून आहे.

वेळीच येथील ग्रामस्थांनी धावपळ केली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे सर्व प्रवाशांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button