breaking-newsमुंबई

पीककर्जाचे वाटप करताना बॅंकांनी संवेदनशीलता दाखवावी

मुंबई – शेतकऱ्यांना पीककर्ज देणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे याचे भान ठेऊन बॅंकांनी काम करावे. त्यानुसार कर्ज वाटप करताना बॅंकांनी संवेदनशीलता दाखवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बॅंक अधिकाऱ्यांना दिले.

पीककर्ज वाटपासंदर्भात मंत्रालयात आज विविध बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुरु झाल्या असून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते घेण्यासाठी वित्तीय सहाय्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप वेळेत झाले पाहिजे.

मात्र, बऱ्याच ठिकाणी स्थानिक बॅंक शाखांकडून यासंदर्भात असंवेदनशीलता दाखविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॅंकांवर रोष दिसून येत असून तातडीने सर्व बॅंकांच्या स्थानिक शाखांपर्यंत पीककर्ज वितरणाबाबत संदेश देण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीमध्ये पीककर्ज देण्यासंदर्भात जो निर्णय झाला आहे, त्याचे पालन सर्वच बॅंकांनी करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, याचे भान ठेवून बॅंकांच्या स्थानिक शाखांनी काम करावे, असे स्पष्ट करत पेरणीसाठी शेतकरी बांधवांना तातडीने कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

हायब्रीड न्युईटीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा 
राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागात 177 कामांच्या माध्यमातून 10 हजार किलो मीटर लांबीचे हायब्रीड न्युईटी रस्ते तयार करण्यात येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या रस्त्यांच्या कामासाठी बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आतापर्यंत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 15 जुलैपासून रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. 4,539 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाची निविदा अंतिम करण्यात आली आहे. हे सर्व कामे मे 2019 पर्यंत पूर्ण करावेत, तसेच ही कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता बॅंकांनी कर्जाच्या रुपाने पतपुरवठा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button