breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“पीएमआरडीए’ला पीएमपीचे साकडे

  • वाघोली : बस डेपो उभारून देण्याची मागणी
    – आर्थिक परिस्थिती नसल्याचे लंगडे कारण

पुणे – पार्किंग, डेपो तसेच रात्री बस उभारण्यासाठी पीएमपी ने “पीएमआरडीए’कडे जागा मागितली होती. यावर वाघोली येथे जागा देऊन त्याचा मोबदला म्हणून 33 कोटी रुपयांची मागणी “पीएमआरडीए’ने केली. पण, आधीच तोट्यात धावणाऱ्या पीएमपीकडे पैसे नसल्याचे सांगत “पीएमआरडीए’ने स्वतःहून वाघोली येथे बसेससाठी डेपो उभारुन देण्याची मागणी पीएमपी प्रशासनाने केली आहे. व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी नुकतेच हे पत्र पाठविले आहे.

पीएमपीच्या दिवसभरात शहर, उपनगरांसह आसपासच्या परिसरात रोज अनेक फेऱ्या होतात. वाघोली, पाबळ, तळेगाव दाभाडे या परिसरातही अनेक बसेस रोज ये-जा करतात. मात्र, दूरच्या मार्गावर रात्री धावणाऱ्या पीएमपी बसेसना परतीच्या प्रवासात थांबविण्यासाठी जागा नाही. परिणामी, या सर्व बस आगारामध्येच परतात. अनेकदा रात्री परतीच्या प्रवासात या बसेस रिकाम्याच धावतात. त्यामुळे मोठा तोटा सहन करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर वाघोली परिसरात डेपो उभारून संबंधित भागात धावणाऱ्या बस त्याच भागात रात्री थांबवून पुन्हा सकाळी फेऱ्या सुरू करण्यास सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे पीएमपीने प्राधिकरणाकडे जागेची मागणी केली आहे. त्यानुसार प्राधिकरणाने काही जागांचे प्रस्ताव पीएमपीला दिले होते. यापैकी वाघोली परिसरात रस्त्यालगत असलेली चार एकर जागा पीएमपीला पसंतीस पडली असून त्याची पाहणीदेखील करण्यात आली आहे. मात्र, “पीएमआरडीए’ने जागा देताना त्याचा मोबदला म्हणून 33 कोटी रुपयांची मागणी पीएमपीकडे केली. यावर अगोदरच तोट्यात चाललेल्या पीएमपीची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे सांगत पीएमआरडीएने स्वतःहून याठिकाणी डेपो उभारुन देण्याची विनंती पीएमपी प्रशासनाने पीएमपीकडे केली आहे.
——————–
डेपो होणे महत्वाचे का?
दिवसेंदिवस पुण्याचा विस्तार वाढून शहरापासून लांबवर राहण्यास नागरिक पसंती देत आहेत. त्यानुसार दळवळणाचा भाग म्हणून या भागात पीएमपी बसेस सोडल्या जातात. येत्या काळात या ठिकाणचा विस्तार लक्षात घेता बसेसची संख्या आणखी वाढवावी लागणार आहे. यामुळे येथील नागरिकांच्या सोयीसाठी येथे पीएमपी डेपो असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पीएमपीने हालचाल सुरू केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button