breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग!

– कार्यकर्त्यांची उत्सुकता; ३० जूनअखेर निर्णय होण्याची शक्यता

– माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

पिंपरी। (अमोल शित्रे)- पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला असून, येत्या ३० जूनपूर्वी नवीन शहराध्याच्या निवडीची घोषणा होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा कार्यकाल नुकताच संपला आहे. त्यातच त्यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी ‘हिरवा कंदील’ दाखवल्यामुळे वाघेरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी आठ-दहा दिवसांत शहराध्यक्ष निवड करण्यात येईल, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, युवा नेते संदीप पवार, युवकचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, नाना काटे आणि प्रशांत शितोळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीमुळे शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे अनेकदा जाहीर केले. त्यामुळे शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विलास लांडे यांचेही नाव शहराध्यक्षपदासाठी चर्चेत होते. त्यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यास अन्य इच्छुकांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

शहरातील आजी-माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक समन्वय राखणा-या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, काळेवाडी येथील हल्लाबोल सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट संकेत दिले होते. ‘‘ज्यांना पक्षाने अनेक पदे दिली मोठे केले, तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. काहींनी पक्षात राहून पक्षविरोधी काम केले, अशा घरभेद्यांना अजितदादा कदापि माफ करणार नाहीत. यासाठी मी त्यांची परवानगी न घेता आता घोषीत करते की, आता जर कोणी परत आला तर, त्याला रांगेत यावे लागेल. तुम्हाला मानाचे पान पक्षात मिळणार नाही. पिंपरी-चिंचवडचा एव्‍हढा विकास करुनही पक्षातील अनेकांनी बाहेरचा रस्ता धरल्यामुळे पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता, हे आम्ही विसरणार नाही,’’ अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या निवडीत आता पक्ष संघटना आणि पक्षाच्या नेत्यांसोबत प्रामाणिक राहणारा चेहऱ्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

‘वन बूथ-२५ यूथ’ची अंमलबजावणी नाहीच…

पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ‘वन बूथ १० यूथ’ हा उपक्रम हाती घेतला. त्यामध्ये काहीसा बदल करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वन बूथ २५ यूथ’ असा उपक्रम राबवण्याचे आदेश दिले. वर्धापन दिन कार्यक्रमापूर्वी विधानसभा मतदार संघनिहाय झालेल्या बैठकांत तसे आदेशही दिले होते. याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी शहराध्यक्ष आणि कार्यकारिणीला ३० जूनपर्यंतची ‘डेडलाईन’ दिली होती. मात्र, अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे ‘बूथ’ निहाय संघटन उभारणे आणि त्यांची यादी तयार करणे विद्यमान कार्यकारिणीला शक्य झालेले नाही. एका बूथवर २५ तरुणांची निवड करण्यासाठी पदाधिका-यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी काम न करणा-यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेणार, असा दिलेला इशारा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button