breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पे अँड पार्क’ बनला गोरखधंदा

पिंपरी-  शहर ‘स्मार्ट’ झाले. मोठे उड्डाणपूल, लांबलचक आणि आकर्षक रस्त्यांनी लक्ष वेधून घेतले. मात्र शहराची आ वासून उभी असलेली समस्या म्हणजे अपुऱ्या वाहनतळाची. याच संधीचा फायदा घेत शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून वाहन तळाच्या नावाखाली गोरखधंदा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्क’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. याच उड्डाणपुलांखाली आता अतिक्रमण झाले आहे. ठिकठिकाणच्या अवैध वाहनतळांसाठी बिनबोभाट हप्ते सुरू असल्याचीदेखील चर्चा आहे. शहराची लोकसंख्या २१ लाखांवर आणि वाहनांची संख्या १६ लाखांवर आहे.
शहरात उग्र रूप धारण केलेली समस्या आहे ती वाहनतळाची. शहरातील खासगी दवाखाने असो, मॉल-थिएटर-मल्टिप्लेक्स की शासकीय कार्यालये; आजही या ठिकाणी अवास्तव वाहनतळ शुल्क आकारले जात आहे. शहरातल्या कोणत्याही प्रशस्त ठिकाणी गेल्यास आजही तासावरून वाहनतळाचे शुल्क ठरवले जात आहे. मात्र तासाला वाढणारे नेमके शुल्क किती आहे, याची शहानिशा न करता नागरिक शुल्क भरतात. वाहनतळ शुल्काच्या बाबतीत नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.

वाहनतळाचे कामकाज हे ठेकेदारांना कंत्राटी पद्धतीने दिले असल्याने वाट्टेल तसे शुल्क घ्यायचे आणि गाडी लावायची असा प्रकार आहे. कंत्राटी पद्धतीने नेमलेले कामगार विनापावतीदेखील शुल्क घेत आहेत. शहरभरातून महिन्याला शेकडो खासगी वाहनतळांच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमा होत आहे. अखेर हा पैसा जातो कुठे, हादेखील गंभीर प्रश्न आहे. शहराला जर सुसज्ज वाहनतळ मिळत नसेल, तर जमा झालेला करदात्यांचा पैसा कशासाठी वापरला जात आहे. अवैध वाहनतळाचा पैसा जमा करणाºया लुटारूंना संरक्षण देण्याचा हा एक प्रकार आहे.
रुग्णालयांकडूनही लूट
सेवा क्षेत्रात मोडत असलेल्या शहरातील रुग्णालयांकडूनही पार्किंगच्या नावाखाली वाहनचालकांची लूट सुरू आहे. रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या वाहनचालकाला सशुल्क वाहनतळाचा वापर करावा लागतो. रुग्णालयांकडून पार्किंगसाठी कंत्राट देण्यात आलेले आहे. संबंधित कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारण्यात येते. सेवा क्षेत्रात मोडत असतानाही रुग्णालये पार्किंग शुल्क आकारत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांची आणि नातेवाइकांची लूट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button