breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीत नवोदितांना संधी की जुन्यांची ‘मोनोपॉली’?

  • शहराध्यक्षपदासाठी नवीन चेह-याच्या नियुक्तीची मागणी
  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

– विकास शिंदे, उपसंपादक, महाईन्यूज

पिंपरी –  पिंपरी-चिंचवडमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला जबाबदारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीप्रेमी कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र, पक्ष संघटनेत पुन्हा ‘सिनिअर’ नेत्याला घोड्यावर बसवण्याचा विचार सुरू  आहे. त्यामुळे ज्या नेत्यांची प्रदेश किंवा जिल्हा पातळीवर नेतृत्त्व करण्याची कुवत आहे. त्यांना शहराच्या चौकटीत बांधून ठेवण्यात पक्षाचे हित आहे का? याचा विचार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करण्याची गरज आहे.

राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये शहराध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार? यावरुन राजकीय चर्चा सुरू आहे. शहराध्यक्षपदाच्या निवडीचा सर्वस्वी अधिकार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील केवळ घोषणा करणार आहेत. सध्यस्थितीला राष्ट्रवादीकडून ‘सिनिअर’ नेत्याला शहराची जबाबदारी देण्याचा विचार आहे. त्यासह दोन कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याद्वारे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वास्तविक, पक्षाला आधुनिक माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि विरोधी पक्षाच्या चुकीच्या कारभारावर अचूक बोट ठेवून विरोधकांची ‘कोंडी’ करणाऱ्या अभ्यासू नेतृत्त्वाची गरज आहे. कारण, गेल्या दीड-दोन वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सुमारे चार हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली. यादरम्यान अनेकदा कोट्यवधी रुपयांच्या भष्ट्राचाराचे आरोप झाले. मात्र, राष्ट्रवादीचा एकही आरोप सिद्ध झाला आणि भाजपला ‘पारदर्शी’ कारभारात अडचण झाली, असे ऐकिवात नाही. भाजपचा अश्वमेध चौफेर सुसाट आहे. पण, कायदेशीर बाबींची पडताळणी करुन सभाशास्त्राचा पुरेपूर वापर करुन सत्ताधाऱ्यांना वेठीस धरणे अद्याप राष्ट्रवादीला संघटना किंवा सभागृहातही शक्य झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

सध्यस्थितीला पक्षातून शहराध्यक्षपदासाठी माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्‍हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे अशा ‘सिनिअर’ लोकांची नावे चर्चेत आहेत. तसेच, नवोदितांमध्ये युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवा नेता संदीप पवार, शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

राष्ट्रवादीने आता कालानुरुप बदलावे

एकेकाळी पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादीतून तीन-चार दिग्गज बाहेर पडले. काही दिग्गज आजही राष्ट्रवादीतच आहेत. मात्र, तरीही महापालिका निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांमुळे नाही, तर राष्ट्रवादीबाबतच्या विरोधी वातावरणामुळे झाला आहे. कारण, भाजपच्या नगरसेवकांमध्ये सुमारे ८० टक्के नगरसेवक नवोदित आहेत. ही बाब राष्ट्रवादीने लक्षात घेतली पाहिजे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीला भाजपच्या सीमा सावळे आणि सारंग कामतेकर या (पूर्वाश्रमीच्या शिवसेनेतील ) जोडीने आव्‍हाण दिले. अनेक आरोप आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत ठेवला आणि राष्ट्रवादीला पुरते हैराण करुन सोडले होते. सोशल मीडिया, प्रींट मीडियाचा यशस्वी समन्वय करुन राष्ट्रवादीविरोधी रान पेटवले.  त्याला भाजपने यशस्वीपणे फुंकर घातली. विठ्ठल मूर्ती खरेदी, सांगवीतील गॅस शवदाहिनी, पक्षातील गुन्हेगारी आदी मुद्यांमुळे राष्ट्रवादी पिछाडीवर राहिली. यातून धडा घेत बाहुबळाचा विचार न करता राष्ट्रवादीने अभ्यासपूर्ण विरोध करणारा नवीन चेहरा पुढे आणला पाहिजे. विरोधी पक्षनेता दत्ता साने आक्रमक आहेतच. पण, त्याला आता अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेच्या शहराध्यक्षाची जोड मिळाली पाहिजे, ही पक्षाची गरज आहे.  कारण, त्यामुळे भाजपला पलटवार करायला संधी मिळणार नाही. भाजपला अनुकूल भूमिका घेणारा शहराध्यक्ष झाल्यास दत्ता सानेही एकाकी पडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने कालानुरुप बदलले पाहिजे.

 ‘सेटलमेंट’ बहाद्दरांना बाजूला ठेवा

पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजप म्हणजे राष्ट्रवादीची बी-टीम असा आरोप केला जातो. तो खराही आहे. कारण, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे हे दोघेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीतील आहेत. मात्र, या दोघांनीही भाजपमध्ये बस्थान बसवताना अनुभवी आणि ‘सेटलमेंट’ बहाद्दरांना सोईस्कर बाजूला ठेवले. काही विश्वासू लोकांसह नवोदितांना घेवून भाजपमध्ये प्रवेश केला. नवखे उमेदवार असूनही भाजपला घवघवीत यश मिळाले. कारण, लोकांना बदल अपेक्षीत होता. राष्ट्रवादीत अनेक दिग्गजांचा धुरळा उडाला आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घुसलेल्या अनेकांनाही लोकांनी सपशेल नाकारले. आता राष्ट्रवादीत निर्णायक भूमिका घेणाऱ्या लोकांमध्ये अनेकजन भाजपशी ‘सेटलमेंट’ करण्यात समाधानी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची अतोनात हानी होत आहे. परिणामी, जगताप किंवा लांडगे यांच्या ‘बैठकीतील’ नेत्याला राष्ट्रवादीने शहराध्यक्षपदी बसवल्यास धंदापाण्याच्या हिशोबानेच पक्ष चालवला जाईल, हा धोका अजित पवार यांनी ओळखला पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button