breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरीत “राजा व्यापारी अन् प्रजा भिकारी”; भाजपतील नाराजांची व्यथा

  • प्रभागातील निधीची पळवापळवी
  • विरोधकांच्या झोळ्या भरण्याचाही उद्योग

 

पिंपरी (अमोल शित्रे) – गेल्या पंधरा वर्षानंतर प्रथमच सत्तांतर झाल्याने महापालिकेतील राजकीय स्थित्यंतरे अत्यंत संशयास्पदरित्या बदलू लागली आहेत. पालिकेतील काही मोजक्या नगरसेवकांचा एक गट स्वतःचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करू लागल्याने सत्ताधारी पक्षाच्या अन्य नगरसेवकांना आर्थिक बंडाळीचा मारा सोसावा लागत आहेत. बजेटची पळवापळवी, कोट्यवधींचे वर्गीकरण आणि विरोधकांच्या झोळ्या भरण्याचा उद्योग सुरू झाल्याने भाजपमध्ये “राजा बनला व्यापारी अन् प्रजा झाली भिकारी”, अशी भावना अन्यायग्रस्त नगरसेवक व्यक्त करत आहेत.

 

भाजपचे आमदार लक्ष्मण (भाऊ) जगताप यांनी जीवाचे राण करून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणली. राष्ट्रवादीचे दस्तुरखुद्द कारभारी अजित (दादा) पवार यांच्याशी वैर घेऊन सदैव कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाऊंनी लढा दिला. पालिकेत सत्ता येताच मागासवर्गीय चेहरा म्हणून निष्ठावंत कार्यकर्त्या सीमा सावळे यांना स्थायी समितीचे सभापती पद दिले. त्यांचा कार्यकाळ संपताच पुन्हा मागासवर्गीय कार्यकर्त्या ममता गायकवाड यांना स्थायीच्या सिंहासनावर बसविले. पक्षनेता, उपमहापौर, विषय समित्यांबरोबर प्रभाग समित्यांवर देखील निष्ठावंतांना संधी दिली. मात्र, दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर आलिकडे पक्षातील जुन्याजाणत्या नगरसेवकांच्या हालचाली बदलल्या आहेत.

 

सत्तेचा मलिदा खाण्यासाठी पक्षातील स्वतंत्र गटाने निधीची पळवापळवी लावली आहे. ऐनवेळचे विषय आणून कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला स्थायीची मान्यता घेतली जात आहे. पदाधिका-यांनी प्रशासनाला गुलामगिरीत ढकलून 250 कोटींच्या वर्गीकरणाच्या विषयांना चुकीच्या पध्दतीने मान्यता घेतली जात आहे. स्वतःच्या झोळ्या भरताना सत्ताधारी अथवा विरोधी पक्षातील विरोधकाचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या प्रभागात पाचपन्नास कोटींची कामे मंजूर केली जात आहेत. त्यातही आर्थिक व्यवहार होत असल्यास मोठी कामे देण्यास हे सत्ताधारी तयार होत आहेत. काही ठराविक नगरसेवक पदाधिका-यांकडून कुरघोड्या केल्या जात असल्यामुळे नवख्या आणि भाऊ निष्ठा जपणा-या नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी केवळ निधी लागतो, एवढेच माहित असते. तो निधी आणण्यासाठी कोणत्या पध्दतीचे राजकारण करावे लागते, हे अद्याप त्यांना उमजत नसल्याचे दिसते. त्यामुळे दीड वर्षात एक रुपयाही मिळाला नसल्याचे सांगत आमच्या पक्षात “राजा बनला व्यापारी अन् प्रजा झाली भिकारी” अशी भावना हेच नगरसेवक व्यक्त करीत आहेत.

 

नवीन नगरसेवकांची आर्थिक चणचण…

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपचा कारभार काही वेगळ्या पध्दतीने करण्यात येणार असल्याचे सांगत नगरसेवकांना कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे अभ्यास दौरे काढण्यात आले. तरीही, नवख्या नगरसेवकांना पालिकेचे कामकाज अद्याप मनात रुजलेले नाही. स्वतःचे कौशल्य वापरून प्रभागाच्या विकासासाठी आर्थिक तजवीज करण्यात हे नगरसेवक निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे दुस-याच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ या नगरसेवकांवर आली आहे. जुनेजानते नगरसेवक अधिका-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टक्केवारीसाठी दबावतंत्राचा वापर करू लागले आहेत. हे ही लक्षात येत नसल्यामुळे या नगरसेवकांची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात आम्हाला काहीही मिळाले नाही. आमदार, खासदारांची नावे सांगून आमच्याच वाट्यातला हिस्सा ओढून नेला जातो. त्यामुळे “आमचा राजा व्यापारी बनला आहे अन् आम्ही भिकारी बनलो आहोत”, अशी अवस्था झाल्याचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक बोलून दाखवित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button