breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पावसाच्या सलामीलाच मुंबईची “तुंबई’

 

तळकोकणातही धूमशान: मराठवाड्यात मुसळधार
देशभरात मान्सूनची वाटचाल तुर्तास समाधानकारक

मुंबई – गोवा, किनारपट्टीवरून महाराष्ट्रात शानदार “एन्ट्री’ करणाऱ्या मोसमी पावसाने शुक्रवारी रात्रीपासून मुंबई आणि तळकोकणाला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात राजधानी मुंबई चारही बाजूंनी तुंबल्याचे चित्र आहे. तर, दुसऱ्या बाजूला मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे उन्हाळा आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत राज्यात मान्सूनने शानदार हजेरी लावली आहे. यात राज्याच्या जवळपास सर्वच विभागांत जोरदार वृष्टी झाली आहे. यात विशेषत: रत्नागिरी, मुंबई, वेंगुर्ला अलिबागसह मध्य महाराष्ट्रात नगरसह पुणे आणि साताऱ्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. तर नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली असून परभणीतही मोठा पाऊस झाला. याशिवाय विदर्भातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया-भंडारा वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. दरम्यान, मोसमी पावसाच्या आगमनावेळी कोरडा राहिलेल्या लोणावळा आणि ताम्हिणी घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झाला आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांना शनिवारी पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तर, मध्य रेल्वेवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चाकरमान्यांच्या वीकेन्डचा खोळंबा झाला आहे. मुंबईतील अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली. याचा परिणाम चाकरमान्यांवरही झाला.

मान्सूनचा प्रवास वेगाने
दरम्यान, शुक्रवारी (दि. 8) रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर त्याचा पुढील प्रवासदेखील तितक्‍याच वेगाने सुरू आहे. मोसमी पाऊस महाराष्ट्रात स्थिरावल्यानंतर आता छत्तीसगड, ओरिसा, पश्‍चिम बंगाल आणि सिक्‍कीमचा काही भाग, झारखंड आणि बिहारसह बंगाल उपसागराच्या ईशान्य भागात येत्या 48 तासांत पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत.

पुढील 24 तासही पावसाचेच
पुढील 24 तासांमध्ये गोवा, कोकण किनारपट्टीसह बहुतांश ठिकाणी, मुंबई आणि उपनगरातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता असून रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणे आणि परिसरात सामान्यत: ढगाळ राहून काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button