breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पारंपारिक वाद्यासह डीजेच्या कर्णकर्कश आवाजात चिंचवडच्या मिरवणुकीची सांगता

  • मंडळांकडून न्यायालयाचे नियम धाब्यावर
  • कारवाईसाठी पोलिसांची हातबलता

पिंपरी – पर्यावरणपूरक देखाव्यांवर भर, व्यसन मुक्तीसह प्रदुषण मुक्तीचा संकल्प करीत चिंचवड भागातील विविध गणेश मंडळांच्या भक्तांनी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला भावपूर्ण वातावरणात रविवारी (दि. ५) निरोप दिला. उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून मिरवणुकीत सर्रास डीजेचा वापर करण्यात आला. मात्र, पोलिसांनी एकावरही कारवाई केली नाही. तथापि, दुपारी दोनच्या सुमारास गावठाणातील मोरया मित्र मंडळाच्या आगमणाने मिरवणुकीला सुरूवात झाली. तब्बल साडेदहा तासांची मिरवणूक काढून गणेश भक्तांनी गणरायांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले.

यावर्षी पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवडमध्ये झाल्याने गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कायदा व सुव्यवस्थेची चांगलीच भिती निर्माण झाली होती. त्यातच डीजे बंदी असल्याकारणाने डीजे वाद्याचा वापर करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, काही मंडळांनी डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला. त्यावर पोलिसांनी कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही. विशेष म्हणजे सण-समारंभावर खर्च करण्यासही निर्बंध असल्याने पालिकेने दरवर्षाची परंपरा खंडीत करत चापेकर चौकात यंदा स्वागत कक्ष देखील उभारला नाही. त्यामुळे चिंचवड भागातील राजकीय पदाधिका-यांना गणेश मंडळांचे स्वागत पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेल्या कक्षातून करावे लागले.

काही गणेश मंडळांनी आकर्षक देखावे सादर केल्याने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केलेल्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. उत्कृष्ट तरूण मंडळाने गजरथामध्ये स्वामी समर्थांची २५ फुटी भव्य मूर्ती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी ते दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत महागाईच्या मुद्याकडेही मंडळांनी लक्ष वेधले. चिंचवड गावठाणातील श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने गॅस आणि पेट्रोल पंपाच्या प्रतिकृतीसह महागाईच्या भस्मासूर वधाचा देखावा सादर केला. जय गुरू दत्त मित्र मंडळाने आकर्षक पुष्परथात गणरायाची मिरवणूक काढली. ज्ञानदीप मित्र मंडळाने ध्वजरथावर भारत मातेची आकर्षक मूर्ती साकारली होती. आदर्श तरूण मंडळाने कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट मंडळाने हलगीवादन पथकासोबत विसर्जन मिरणूक काढली. रात्री बारा वाजता समाधान मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चापेकर चौकात दाखल झाली.

पोलिसांनी रात्री बारानंतर सर्व मंडळांच्या ढोल-ताशांचा आवाज बंद केला. मिरवणुकीत काही अनसूचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा खडा पहारा होता. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि गणेश मंडळांच्या पारंपारिक पद्धतीमुळे शांततेत गणपतीचे विसर्जन झाले. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, रोट्रॅक्ट क्लब, संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. विसर्जन घाटावर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित. स्वसंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच पोलीस मित्रांच्या वतीने गर्दीवर नियंत्रण घेण्यात येत होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता चिंचवडमध्ये विसर्जन मिरवणूक पार पडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button