breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पादचाऱ्यांच्या मोबाइलवर चोरटय़ांची नजर

बेसावध नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावून पलायन

मुंबई : सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना जेमतेम यश येते तोच, आता मोबाइल चोर मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. मोबाइलवर बोलण्यात मग्न झालेले पादचारी या मोटारसायकलवरून येणाऱ्या चोरांचे लक्ष्य ठरत आहेत. गेल्या काही दिवसांत शहरातील बहुतेक पोलीस ठाण्यांत अशाप्रकारचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

कधीकाळी शहरात पाकीटमारांची दहशत होती. डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे आर्थिक व्यवहार होऊ लागल्यानंतर पाकीटमारांचा जाच आपोआप कमी झाला. त्यानंतर बरीच वर्षे सोनसाखळी चोरांनी शहरात उच्छाद मांडला होता. ते मोटरसायकलवरून येऊन सोनसाखळी हिसकावून वेगाने पसार होत. त्यांची गुन्ह्य़ाची पद्धत, ठिकाणे, पाश्र्वभूमीचा अभ्यास, व्यूहरचना बदलून, विशेष पथक तयार करून, जामीन होऊ नये व कडक शिक्षा व्हावी म्हणून जबरी चोरीचे कलम लावून, मुंबई-ठाण्यात मोक्कान्वये कारवाई करून, त्यांचे लॉकरही तपासून पोलिसांनी या चोऱ्यांवर नियंत्रण आणले. त्यामुळे आता चोरांनी आपला मोर्चा मोबाइल फोनकडे वळवला आहे.

मोटारसायकलवरून येऊन मोबाइल फोन हिसकावून पळून जाण्याचे गुन्हे वाढले आहेत. माटुंगा पोलीस ठाण्यातील अन्वेषण पथकाचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे आणि पथकाने गेल्या आठवडय़ात आसिफ, सादिक अस्लम या दोन तरुणांना अटक केली. त्यांनी असे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. मोबाइल हिसकावल्यानंतर त्यातील

सिमकार्ड फेकून द्यायचे आणि काही दिवसांनी त्यासाठी ग्राहक शोधायचा, २० ते २५ हजार रुपयांचा मोबाइल फोन दोन ते तीन हजारांना विकून मोकळे व्हायचे. आलेल्या पैशांतून चंगळ करायची हा या दोघांचा दिनक्रम होता.

पोलीस पथकाने पकडले तेव्हा हे दोघे फाइव्ह गार्डन परिसरात लक्ष्य शोधत होते. मोबाइलवर बोलत, तो हाताळत, गेम खेळत रस्त्यांवरून चालणारे, रस्ते ओलांडणारे यांना मोबाइल चोर लक्ष्य करत आहेत.

फरफटत नेले

* २ फेब्रुवारीला पहाटे पाचच्या सुमारास सीएसटी मार्गावरून पायी जाणारा मोहम्मद इम्रान शेख याचा महागडा फोन हिसकावण्याचा प्रयत्न झाला. मोटारसायकलवर तीन व्यक्ती होत्या. त्यापैकी मधल्याने मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. ‘मी मोबाइल घट्ट पकडला होता. त्यामुळे बरेच अंतर तिघांनी फरपटत नेले. अखेर माझ्या हातातून मोबाइल सुटला,’ असा जवाब शेख याने कुर्ला पोलिसांकडे नोंदवला आहे.

* ३१ जानेवारीला बांगुरनगर, जोडरस्त्यावरील बस थांब्यावर पार्थ तिवारी फोनवर मित्राशी बोलत होता. इतक्यात मागून आलेल्या मोटारसायकलच्या मागच्या सीटवर बसलेल्या तरुणाने त्याच्या हातातील फोन हिसकावला आणि धूम ठोकली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button