breaking-newsमुंबई

पाणीटंचाईचा पाढा

  • स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवकाचा ठिय्या; सर्वपक्षीयांची प्रशासनावर टीका

मुंबई – विविध कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे मुंबईतील विविध भागांत असंतोष निर्माण झाला असून त्याचे पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. स्थायी समितीत सदस्य असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकाने बैठकीतच ठिय्या आंदोलन केले तर सत्ताधारी शिवसेनेसह अन्य पक्षांच्या सदस्यांनीही या मुद्दय़ावर प्रशासनाला धारेवर धरले.

पवई ते वेरावलीदरम्यान सुरू असलेल्या जलबोगद्याच्या कामामुळे गेल्या वर्षभरापासून विलेपार्ले आणि आसपासच्या परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात आता १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून नागरिकांचे हाल होत आहेत. जोपर्यंत या भागाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत आपण स्थायी समितीच्या सभागृहातून बाहेर जाणार नाही, असा इशारा देत भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीतच ठिय्या आंदोलन सुरू केले. तर भाजपचे दुसरे सदस्य विद्यार्थी सिंग यांनी जलअभियंत्यांनाच सभागृहात रोखून ठेवू, असा इशारा दिला. त्यानंतर  स्थायी समिती सदस्य प्रभाकर शिंदे, मंगेश सातमकर, मकरंद नार्वेकर, राजूल पटेल, राजश्री शिरवाडकर, सदानंद परब, राखी जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख, भाजपचे गटनेते मनोज कोटक आदींनी अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा या वेळी वाचला.

‘प्रशासन मुंबईला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत आहे. पण नागरिकांना प्रत्यक्षात दोन तासही पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठय़ामागे टँकर माफियांचा हात आहे,’ असा आरोप या वेळी नगरसेवकांनी केला. मुंबईत अनेक भागांत पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. पण मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मग पाणी जाते कुठे, असा सवाल काही नगरसेवकांनी केला. दुष्काळ पडल्यानंतर पालिकेने रिंगवेल, बोअरवेलसाठी परवानगी देण्याचे, तसेच नव्या इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचयन प्रकल्प सक्तीचे करण्यात आले होते. त्याचा प्रशासनाला आता विसर पडला आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

विलेपार्ले परिसराला ‘वेरावली २’ व ‘वेरावली ३’ येथून पाणीपुरवठा होतो. या जलाशयांची पातळी असमतोल राहिल्यामुळे अपुरा पाणीपुरवठा झाला होता. मात्र आता सुरळीत पाणीपुरवठा होत असून प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेण्यात येतील आणि समस्या दूर करण्याचे आश्वासन तवाडिया यांनी दिले. मात्र या उत्तरामुळे सामंत खवळले. प्रशासन एका विभागाच्या पाण्याचा दुसऱ्या विभागाला पुरवठा करीत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न चिघळू लागल्याचा आरोप सामंत यांनी केला. अखेर स्थायी समितीचे कामकाज संपले आणि बैठक आटोपली. मात्र सामंत सभागृहातच बसून होते. अखेर गुरुवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन तवाडिया यांनी दिल्यानंतर सामंत यांनी आंदोलन आटोपते घेतले.

१५० दशलक्ष लिटर पाण्याची गळती

उच्चस्तर वैतरणा, मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणामधून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणी जलवाहिन्यांतून मुंबईत वाहून आणले जाते. त्यापैकी १५० दशलक्ष लिटर पाण्याची गळती होते. जलशुद्धीकरणानंतर लहान-मोठय़ा जलवाहिन्यांच्या जाळ्यामार्फत ३८०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार तलावांमध्ये नऊ लाख ५० हजार ९१९ दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये ११ लाख ७४ हजार १६६ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. जलसाठय़ातील तूट लक्षात घेता जून २०१९ पर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा करता यावा यासाठी १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

‘चने पे चर्चा’

बैठक सुरू असताना भाजपच्या नगरसेविका बैठकीबाबतचा शिष्टाचार खुंटीला टांगून चण्यांचा आस्वाद घेत होत्या. बैठक संपली, मात्र पुडीमध्ये भरपूर चणे शिल्लक होते. अभिजीत सामंत यांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते. अन्य सदस्य त्यांच्या जवळ जमा झाले. टेबलावर ठेवलेल्या चण्याचा आस्वाद घेत सदस्यांमध्ये पाणी प्रश्नावर चर्चा रंगली. अगदी विरोधी पक्षनेते, समाजवादी पार्टी, भाजपचे गटनेते आणि अन्य सदस्यही ‘चने पे चर्चा’मध्ये सहभागी झाले. सामंत यांनाही चणे देत पाणी प्रश्नावर चर्चा करीत होते. अखेर आंदोलन मागे घेतल्यानंतरही चणे खात खात सदस्य सभागृहाबाहेर पडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button