breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पाणीकपात लवकरच रद्द

जलस्रोतांमध्ये ५० टक्के पाणीसाठा; राजकीय दबाव तीव्र

मुंबई : पावसाने यंदा महिनाभर उशिराच हजेरी लावल्यामुळे दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत कमी पाणीसाठा आहे. असे असतानाही मुंबईत नोव्हेंबरपासून पाणीपुरवठय़ाच्या वेळेत करण्यात आलेली कपात रद्द करण्यासाठी पालिकेवर राजकीय दबाव वाढू लागला आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. कपात रद्द झाल्यास उपनगरांतील नागरिकांचे पाणीहाल थांबणार आहेत.

सध्या मुंबईच्या जलस्रोतांमध्ये ५० टक्के पाणीसाठा असला तरी भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टीने सध्या पाणीकपात रद्द करणे योग्य नसल्याचे प्रशासनाचे (पान २ वर) (पान १ वरून) म्हणणे आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पाणीकपात करूनही सातही धरणांतील पाणीसाठा अत्यंत खालावला होता. राखीव साठा वापरण्याची वेळ आली होती. मात्र जूनच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसामुळे तलावातील पाणीसाठा वाढून आता ५० टक्के झाला आहे. गुरुवारी सकाळी सातही तलावात मिळून ७ लाख ३५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता. मात्र गेल्या वर्षीपेक्षा तो खूपच कमी आहे. पाणीसाठा ५०  टक्के झाल्यामुळे आता पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष करू लागले आहेत.

पालिका म्हणते..

‘गेल्यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला, मात्र नंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. आताही धरणात ५० टक्के पाणी जमा झाले असले, तरी पावसाने मात्र पाठ फिरवलेली आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा आताचा पाणीसाठा कमी असताना पाणीकपात रद्द झाल्यास हे पाणी वर्षभर पुरवणे अवघड होणार आहे,’ अशी माहिती एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने दिली.

राज्यमंत्र्यांची सूचना

मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील उपयुक्त साठय़ामध्ये आतापर्यंत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहर व उपनगरातील १० टक्के पाणीकपात तसेच पाणीपुरवठय़ाच्या वेळेतील कपात रद्द करावी, अशी सूचना नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केली आहे. अद्याप ५७ दिवस पावसाचे आहेत. या काळात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीसाठय़ात वाढच होईल. मुंबईतील विशेषत: उपनगरातील नागरिकांना या कपातीचा त्रास होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पाणीकपात रद्द करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी काही चर्चा झाली का, असे विचारता अद्याप बोलणे झालेले नाही, असे सागर यांनी स्पष्ट केले.

गरज किती?

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून पालिकेने मुंबईत दहा टक्केपाणीकपात केली. तर पाणीपुरवठय़ाच्या वेळेत १५ टक्के कपात करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे ऊध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात तलावांत मिळून गुरुवारी सध्या ७ लाख ३५ हजार ०४२ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सातही तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला तरच मुंबईची वर्षभराची पाण्याची मागणी पूर्ण होऊ  शकते.

जलस्थिती..

१८ जुलै २०१९   ७,३५,०४२ दशलक्ष लिटर  (५० टक्के)

१८ जुलै २०१८   १०,९२.२०७ दशलक्ष लिटर (७५.४६ टक्के)

१८ जुलै २०१७   १०,२८,४२२ दशलक्ष लिटर ( ७१.०५ टक्के)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button