breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तान दहशतवाद्यांचा पालक आणि संरक्षक

  • पाक परराष्ट्र मंत्र्यांच्या दाव्यावर भारताकडून जोरदार टीका 
न्यूयॉर्क– परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्दयावर पाकिस्तानवर तीव्र टीका केल्याच्या दुसऱ्या दिवशीही संयुक्‍त राष्ट्राच्या महासभेमध्ये भारताकडून पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला गेला. पेशावरमध्ये 2014 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात आहे, असा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला होता. त्यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आणि पाकिस्तानच “दहशतवाद्यांचा पालक आणि संरक्षक आहे.’ अशी तीव्र टीका केली. संयुक्‍त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव एनाम गंभीर यांनी पाकिस्तानचा दावा खोडून काढला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेला दावा अत्यंत अपमानास्पद आणि परस्परविसंगत असा आहे, असे त्या म्हणाल्या.
संयुक्‍त राष्ट्रातील चर्चेदरम्यान उत्तर देताना गंभीर यांनी पाकिस्तानच्या नवीन सरकारला पेशावर हल्ल्याची पार्श्‍वभूमीच माहिती नसल्याचे सांगितले. पेशावरच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याच्यावेळी भारताकडून तीव्र दुःख आणि वेदना व्यक्‍त झाली होती. या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या बालकांप्रती भारतीय संसदेने सहवेदना व्यक्‍त केली होती. या दुःखद घटनेच्या निषेधार्थ आणि मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतातील सर्व शाळांमध्ये दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले होते, असे गंभीर यांनी सांगितले.
संयुक्‍त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या 132 दहशतवाद्यांचे पालक आणि संरक्षक पाकिस्तानच आहे, हे पाकिस्तान नाकारू शकत आहे का ? संयुक्‍त राष्ट्राने नियम 1267 अंतर्गत आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1988 च्या ठरावानुसार बंदी घातलेल्या 22 संघटनांचे पालक आणि संरक्षक पाकिस्तानच आहे, हे अमान्य आहे का? असा सवालही गंभीर यांनी उपस्थित केला.
पेशावरच्या हल्ल्यामागे भारतच असल्याचा पाकिस्तानचा कांगाव्यामधून पाकिस्तानच दहशतवादाच्या राक्षसापासून दूर पळण्याचा खटाटोप दिसतो आहे. पाकिस्तानने शेजारी देशांना अस्थिर करण्यासाठी उभा केलेला हा भस्मासूर आता त्याच देशाला सतावतो आहे, असे गंभीर म्हणाल्या. 26/11 चा मास्टर माईंड “हाफिझ सईद’ पाकिस्तानात खुल्या वातावरणात फिरत असल्याच्या संदर्भाने बोलताना पाकिस्तानने विपर्यस्त, फसवणूक आणि लबाडी करणे थांबवावे, असेहे गंभीर म्हणाल्या.
चर्चा नाहीच… 
विदेश मंत्र्यांमधील चर्चा भारताने फिल्मी पद्धतीने रद्द केली, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले होते. मात्र भारतीय सैनिकांच्या हत्यांच्या पार्श्‍वभुमीवर पाकिस्तानशी चर्चा केली जाऊ शकत नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादातून मरण पावलेल्या प्रत्येक प्राणाचे भारतासाठी मोल अनन्यसाधारण आहे, असेही गंभीर यांनी सुनावले. काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत झेद राद अल हुसैन या संयुक्‍त राष्ट्रातील माजी पदाधिकाऱ्याच्या अहवालाचा हवाला शाह मेहमुद कुरेशी यांनी दिला आहे. मात्र या अहवालाची मागणी संयुक्‍त राष्ट्रातल्या कोणाही सदस्य देशाने केली नसल्याचे तथ्यही गंभीर यांनी मांडले. 
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button