breaking-newsमहाराष्ट्र

पहिली उचल एकरकमी ३२१७ द्या : जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत मागणी

कोल्हापूर – यंदाच्या हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी (सरासरी १२.५० उतारा) पहिली उचल एकरकमी ३२१७ रुपये व उर्वरित महाराष्ट्रासाठी (सरासरी ११.५० उतारा) २९२८ रुपये दिल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टीयांनी शनिवारी येथे झालेल्या विराट ऊस परिषदेत केली.

जे कारखाने आता सुरूझाले आहेत ते बंद करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मागील वर्षांच्या तडजोडीनुसार एफआरपी व टनास २०० रुपये जास्त द्यायचे ठरले होते, ही रक्कम घेतल्याशिवाय कारखानदारांच्या बापाला सोडणार नाही, असेही शेट्टी यांनी जाहीर केले. येथील विक्रमसिंह मैदानावर ही १७ वी ऊस परिषद झाली. या परिषदेने आजपर्यंतचा गर्दीचा उच्चांक मोडला.

या परिषदेत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर वक्त्यांनी टीकेची झोड उठविली. शेट्टी यांनी मात्र आपल्या तासभराच्या भाषणात ऊसदराचा सूत्रबद्ध हिशेब मांडला व राज्यातील भाजप सरकारला सत्तेवरून हाकलून देण्याचे आवाहन केले. या सरकारचे आता सात-आठ महिनेच राहिले असल्याचेही शेट्टी यांनी जाहीर करून टाकले. कोडोली येथे सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या परिषदेत शेट्टी यांच्यावर झालेल्या टीकेला अन्य वक्त्यांनी प्रत्युत्तर दिले. शेट्टी यांनी मात्र या परिषदेत त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतेही वक्तव्य केले नाही, शिवाय खोत यांची तर त्यांनी दखलही घेतली नाही. संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते.

कोडोली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत सदाभाऊ खोत यांनी एफआरपी व २०० रुपये जादा देण्याची मागणी केली होती. तोच धागा पकडून खासदार शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे भले होत असेल तर आम्हाला कोणत्याही श्रेयवादात पडायचे नाही. खोत यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनाही मान्य असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारखानदार, शेतकरी संघटनेचे नेते यांची बैठक बोलवावी व ९.५ टक्क्यांचा बेस धरून २७५० रुपये व त्यावरील प्रत्येक एका टक्क्यास २८९ व त्यावर २०० रुपये जादा एवढी एकरकमी उचल द्यावी. आमची त्यासाठी तयारी आहे. मुख्यमंत्र्यांना हे मान्य असेल तर त्यांनी त्याचा शासन आदेशही काढावा. तुमचा वाहतुकीचा दर ठरलेला नाही, राज्य व जिल्हा बँकांनी किती मूल्यांकन धरून उचल द्यायची हे ठरलेले नसताना कारखानेच सुरूकरण्याची घाई करू नये.’

परिषदेत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, डॉ. प्रकाश पोफळे, सयाजी मोरे, कर्नाटकातील रयत संघटनेचे चंद्रशेखर कुडिहळ्ले, हंसराज वडगुले, रसिका ढगे, पूजा मोरे, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, भगवान काटे यांची भाषणे झाली. कवी संदीप जगताप यांनी शेतकºयांची स्थिती मांडणारी कविता सादर केली.

परिषदेस पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, सुबोध मोहिते, मिश्रीलाल जाजू, आदी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील संघटनेचे झुंजार कार्यकर्ते काळूराम काका यांचा परिषदेत सत्कार करण्यात आला. पैलवान विठ्ठल मोरे यांनी स्वागत केले. अजित पोवार यांनी प्रास्ताविक केले. अभय भिलवडे यांनी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button