breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग लवकरच

पावसाळय़ानंतर काम सुरू होणार; थेट लोकलसेवा चालवणेही शक्य

मुंबई : पनवेल ते कर्जत अशा थेट लोकल गाडय़ा सुरू होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. एमयूटीपी-३ अंतर्गत असलेल्या पनवेल ते कर्जत दुहेरी मार्गाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात आली असून त्याला प्रतिसादही मिळाल्याची माहिती एमआरव्हीसीतील (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पनवेल ते कर्जत सध्या एकच मार्गिका असून लांबपल्ल्याच्या गाडय़ा किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. मात्र त्यात बराच वेळ जातो. जर पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना मिळू शकतो.

एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांचा खर्च १० हजार ९४७ कोटी रुपये असून यात पनवेल ते कर्जत दुहेरी मार्गाचा खर्च २ हजार ७८३ कोटी रुपये आहे. एमयूटीपी-३ साठी रेल्वे, राज्य सरकारकडून निधी मिळतानाच जागतिक बॅंकेकडूनही निधी मिळणार होता. मात्र या प्रकल्पाऐवजी एमयूटीपी-३ ए मधील पनवेल ते विरार नवीन मार्गाला प्राधान्य द्या, अशी अट बँकेने ठेवली होती. परंतु ही चर्चा फिस्कटली. त्यामुळे निधीसाठी एमआरव्हीसीने अन्य बॅंकांशी बोलणी सुरू केली असून त्यावर येत्या दोन ते तीन महिन्यांत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. तोपर्यंत रेल्वे व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीवर एमयूटीपी-३ मधील काही कामे केली जात आहेत. यातून पनवेल ते कर्जत दुहेरी मार्गिकेच्या कामालाही मुहूर्त देण्यात आला आहे. दुहेरी मार्गिकेच्या कामांसाठी निविदा काढण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांना सुरुवात करण्यात येईल, असे एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विरार ते डहाणू चौपदरीकरणाच्याही निविदेला प्रतिसाद

एमयूटीपी-३ मधील विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाचेही काम पावसाळ्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठीही निविदा काढण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या दोनच मार्ग असल्याने लोकल व लांबपल्ल्याच्या गाडय़ा येथून जातात. लोकल प्रवास सुकर करण्यासाठी चार मार्गिका बांधण्याचा एमआरव्हीसीचा प्रस्ताव आहे.

प्रकल्पात नवीन स्थानके

या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेल ते कर्जत दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. प्रकल्पात पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

अन्य कामांच्या निविदा

प्रकल्पात होणारे छोटे-मोठे पूल, रुळांबाजूकडील पदपथ यासह अन्य कामांची निविदा काढली आहे.  एखाद्या संस्थेकडून निधी हवा असल्यास त्याला प्रकल्पाची माहिती देणे आवश्यक असते. त्यानुसार एमआरव्हीसीने ‘एआयबी’ या निविदा देणाऱ्या बॅंकेलाही प्रकल्पाचा अहवाल सादर केला असून त्यांच्याकडील मंजुरीनंतरच निविदा प्रक्रिया पुढे सरकल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button