breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पदयात्रा, रोड शो, चौकसभांचा भडिमार

मुंबईतील उमेदवारांकडून प्रचारासाठी शेवटचा रविवार सत्कारणी

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अखेरच्या टप्प्यात १७ मतदारसंघांत २९ एप्रिलला मतदान होणार असल्याने आजचा जाहीर प्रचाराचा शेवटचा रविवार मुंबईतील उमेदवारांनी सार्थकी लावला. मुंबईत कडक उन्हातही रोड शो, पदयात्रा, चौक सभा आणि मतदारांशी थेट संवाद साधून उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला.

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपवून प्रमुख नेत्यांच्या ‘तोफा’ आता मुंबईत येऊन थडकल्या आहेत. सोमवारपासून आठवडाभर मुंबई-ठाणे- पालघर- नाशिक पट्टय़ात या तोफा धडाडणार आहेत. निवडणुकीच्या अखेरच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला अवघा एक आठवडा उरला आहे. त्यामुळे सोमवारपासून निकराचा प्रचार सुरू होईल. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास आणि प्रत्येक मिनिट सार्थकी लावण्याचा प्रयत्न उमेदवार करतील.

जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उमेदवारांनी नवनवीन मार्गाचा अवलंब सुरू केला आहे. मुंबई महानगर प्रचारमय झाले असून उमेदवार आणि नेत्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उसंत मिळणे कठीण झाले आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघांतील उमेदवारांनी आज रविवारच्या सुट्टीची संधी साधत मतदारांना गाठण्याचा, त्यांच्या गाठीभेटीचा, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी दुचाकी फेरी आणि पदयात्रा काढून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघातील विविध भागांत फिरून थेट मतदारांशी संवाद साधताना दिसत होते.

उद्याने, सार्वजनिक वाचनालये तसेच चहाच्या स्टॉल्सना भेटी देत कोटक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधला. याच मतदारसंघातील राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड, मानखुर्द, शिवाजी नगर आदी भागांत पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी चेंबूर भागात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधत प्रचार केला. तर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी प्रचारासाठी आगळीवेगळी कल्पना राबविताना रिक्षावाल्याच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. निरुपम यांचे फोटो रिक्षावर लावून या रिक्षाच मतदारसंघात फिरविल्या जात आहेत.

दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी कुलाबा परिसरातील गीता नगर आणि ताडदेव परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त यांनी कुर्ला आणि विलेपार्ले परिसरांत पदयात्रा काढली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button