पत्नीचे वजन वाढल्याने पतीने ठेवले उपाशी
पत्नीचे वजन वाढल्याने तिला पतीने उपाशी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती पत्नीमधील भांडणे, पत्नीवर हुंडा आणण्यासाठी दबाव टाकण्याच्या घटना, छळ केल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच पुण्यात एका पत्नीला तिच्या पतीने वजन उपाशी ठेवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात या पतीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील उंड्री येथील इस्टेट इस्टोनिया सोसायटीत हे दोघेही राहात होते. या दोघांमध्ये २००६ ते २०१६ या कालावधीत अनेकदा भांडणं आणि वादविवाद झाले. वाद झाले की तुझे वजन वाढले आहे असे सांगून पती त्याच्या पत्नीला उपाशी ठेवत होता. आपल्याला उपाशी का ठेवलं? हे विचारतही या दोघांमध्ये वाद होत असत. या प्रकरणी पीडित पत्नीने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत गुन्हा नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येतो आहे. या महिलेचा पती घर सोडून बावधन येथे राहण्यास गेला आहे. त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
तक्रार करणारी महिला आणि तिचा पती दोघेही खासगी कंपनीत काम करत होते. या दोघांना दोन मुलं आहेत, पत्नीचा छळ करून पती तिला न सांगता घरातून निघून गेला. त्यामुळे ती मुलांसह राहात होती. आता तिच्या पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तसेच पत्नी ज्या घरात राहते ते घर विकण्यासाठीही तगादा लावला आहे. गेल्या महिन्यात या महिलेची नोकरी गेली त्यामुळे तिच्यापुढे आता मुलांच्या संगोपनाचाही प्रश्न आहे. मुलांचा सांभाळ करता येत नसल्याने तिने पोलिसात धाव घेतली आता मला न्याय हवा आहे असे या महिलेने म्हटले आहे.