breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंधरा वर्षातील 90 टक्के प्रलंबित प्रश्न भाजपने सोडविले – आमदार जगताप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवडचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित होते. राज्यात भाजपची सत्ता येताच गेल्या चार वर्षांत मी स्वतः आणि आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करून प्रलंबित असलेले ९० टक्के प्रश्न सोडवले आहेत, अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या कामाची पावती दिली.

निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, दिलीप कांबळे यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी होत होती. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. पुढील दहा वर्षांत शहराला पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी पवना, इंद्रायणी आणि भामा-आसखेड या तीन धरणातून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर केला. अमृत योजनेअंतर्गत शहरासाठी ३०० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मिळवून दिले. शहराचा स्मार्ट सिटी योजनेतही समावेश केला. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातून सर्वात जास्त निधी पिंपरी-चिंचवडला दिला. या येजनेअंतर्गत शहरात सुमारे २० हजार घरे उभारण्यात येणार आहेत. मोशी कचरा डेपोच्या भोवती बफर झोनची हद्द १०० मीटरपर्यंत आणले. नागपूरसारखेच पिंपरी-चिंचवडमध्येही मेट्रोचे काम वेगाने व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून काम प्रगतीपथावर आणले. शहरासाठी वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध करून दिले.

झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी एफएसआयचे धोरण करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार करावा. नदी सुधार प्रकल्पामुळे शहरातील नद्यांचे पुनरूज्जीवन होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नदी सुधार प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी प्राधान्याने मार्गी लावावा. पुण्यासारखेच पिंपरी-चिंचवड शहर एज्युकेशन हब व्हावे, यासाठी प्राधिकरणामार्फत जागा उपलब्ध करून द्यावी. हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी एलिव्हेटेड मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच, सलग उड्डाणपुलांमुळेदेखील हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांत लक्ष घालावे. शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पवना जलवाहिनीचा प्रश्न समजुतीने सोडवण्यासाठी मावळमधील भूमीपुत्रांना विश्वासात घ्यावे. त्यांच्या संमतीनेच पवना जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावावा. महापालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेतृत्वाने माझ्यावर आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली. आता मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि पक्षाने आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवावा. या दोन्ही मतदारसंघाचे खासदार हे भाजपचेच असतील, असा विश्वासही आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button