पंतप्रधान मोदींना आता राहुल गांधींचे ‘फ्यूएल चॅलेंज’
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या ‘फिटनेस चॅलेंज’ मोहिमेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्वीकारणाऱ्या पंतप्रधानांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत; अन्यथा देशव्यापी आंदोलन करून काँग्रेस तुम्हाला किंमती कमी करण्यास भाग पाडेल, असे थेट आव्हानच त्यांनी मोदींना दिले.
केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरू केलेल्या ‘हम फिट तो इंडिया फिट’ चॅलेंज मोहिमेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यांनी विराट कोहलीला फिटनेस चॅलेंज दिले होते. विराट कोहलीने ते स्वीकारले. त्याचबरोबर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग करून फिटनेस चॅलेंज दिले होते. मोदींनीही विराटचे चॅलेंज स्वीकारून लवकरच व्हिडिओ शेअर करणार असल्याचे सांगितले. विराटचे आव्हान स्वीकारणाऱ्या मोदींना राहुल यांनी फ्यूएल चॅलेंज दिले आहे. ‘तुम्ही विराटचं फिटनेस चॅलेंज स्वीकारल्याचं पाहून खूप बरं वाटलं. आता मी तुम्हाला एक चॅलेंज देत आहे. तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अन्यथा देशव्यापी आंदोलन करून ते कमी करण्यास आम्ही भाग पाडू. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे,’ असं राहुल म्हणाले.