breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीमधील 12 प्रमुख मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्यांनी नोटाबंदी, राम मंदिर, रिझर्व्ह बँक वाद आदी मुद्द्यांवर भाष्य केले. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेली ही मुलाखत 95 मिनिटांची आहे. या मुलाखतीत मोदींनी मांडलेल्या प्रमुख मुद्द्यांचा घेतलेला आढावा….

1. नोटाबंदी हा झटका नाही!

देशात लागू झालेली नोटाबंदी हा झटका नव्हता, उलट लोकांना वर्षभर आधीच पूर्वसूचना दिली होती, असे मोदींनी सांगितले. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनी तो दंड भरून जाहीर करावा, अशी मुभा दिली होती, पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, असा दावाही त्यांनी केला. आपल्याकडील काळा पैसा दंड भरून बँकेत जमा करा, अशी मुभा दिली गेली होती. मात्र मोदीसुद्धा इतरांसारखेच केवळ बोलघेवडे असतील, या भ्रमात लोक राहिले. त्यामुळे आमच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.त्यानंतर वर्षभराने म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर झाली, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

2. कर्जमाफी हा सापळाच!
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोदी म्हणाले की, कर्जमाफीने शेतकऱ्यांचा खरेच फायदा होत असेल, तर ती अवश्य दिली जाईल. पण कर्जमाफी हा शेतीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाही. आमच्या यंत्रणेतील काही त्रुटींमुळे आजवर असे घडले आहे की, शेतकरी अधिकाधिक कर्जात रूतत चालला आहे, तर निवडणुका आणि कर्जमाफीच्या घोषणांच्या दुष्टचक्रात सरकारे सापडली आहेत. शेतकऱ्यांना सक्षम करणे, हाच खरा उपाय आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांपासून बाजारापर्यंतच्या सर्व सुविधा कशा मिळतील, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

3. पाकिस्तान एका युद्धाने सुधारणार नाही
लक्ष्यभेदी कारवाईनंतरही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कमी का झाला नाही, यावर मोदी म्हणाले की, केवळ एखाद्या युद्धाने पाकिस्तान सुधारेल, असे मानणे ही मोठी चूक ठरेल. तो केवळ एका युद्धाने बदलणारा नाही. अर्थात केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, भारताने पाकिस्तानशी संवाद साधण्यास कधीच विरोध केला नाही. पाकिस्तानबाबत मोदी वा मनमोहन सरकार नव्हे तर देशाने सातत्यपूर्ण धोरण राबवले. आम्ही फक्त इतकेच म्हणत आहोत की, बॉम्ब आणि गोळ्यांच्या आवाजात संवाद होऊ शकत नाही.

4. काँग्रेस-मुक्तीचा अर्थ
मी जेव्हा काँग्रेस-मुक्त भारत म्हणतो तेव्हा काँग्रेसच्या भ्रष्ट संस्कृतीपासूनची मुक्ती अपेक्षित असते. काँग्रेसलाही या संस्कृतीपासून मुक्त होण्याची गरज आहे.

5. तिहेरी तलाक समानतेसाठी
तिहेरी तलाक ही बाब धार्मिक श्रद्धेशी निगडीत नाही. ती स्त्री-पुरुष समानतेची आणि सामाजिक न्यायाची आहे. बहुतांश इस्लामिक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे, असेही ते म्हणाले.

6. शबरीमला मात्र परंपरेची बाब!
तिहेरी तलाकविरोधातील भाजपचा समानतेचा आग्रह शबरीमलात मात्र फिका पडतो, त्याबाबत छेडता मोदी म्हणाले की, प्रत्येकाला न्याय मिळावा असे देशवासीयांचे मत आहे. काही देवळांची स्वत:ची परंपरा असून ती पाळली जाते. त्यामुळे काही देवळांमध्ये पुरुषांना जाता येत नाही आणि ते जातही नाहीत. शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांनीही देशातील धार्मिक परंपरांबाबत काही निरीक्षणे नोंदवली आहेत. ती बारकाईने पाहिली पाहिजेत. ती निरीक्षणे कुठल्याही एका राजकीय पक्षाला उद्देशून केलेली नाहीत, असेही ते म्हणाले.

7. ऑगस्टा वेस्टलँड
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील दलाल ख्रिस्तियन मिशेल याला वाचवण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रयत्न करत असतील तर ती चिंतेचीच बाब ठरते, असे मोदी म्हणाले. ‘राझदारा’ला भारतात आणले गेले आहे याचा देशवासीयांना गर्व वाटला पाहिजे. आता कायदेशीर चौकशी होईल आणि सत्यही समोर येईल. पण, काँग्रेस मिशेलच्या पाठिंब्यासाठी वकिलांची फौज पाठवत आहे, असेही त्यांनी सांगितले.

8. राफेलचे आरोप लष्करविरोधी
’राफेलवरून केले जाणारे सर्व निराधार आरोप हे लष्कराला खच्ची करू पाहणारेच करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ’माझ्यावर होणाऱ्या आरोपांकडे मी लक्ष द्यायचे की, देशाच्या संरक्षणाच्या गरजांकडे अधिक लक्ष द्यायचे? माझ्याविरोधात कितीही आरोप झाले, माझ्यावर शाब्दिक हल्ले चढवले तरी मी प्रामाणिकपणे पुढे चालत राहीन. ’देशाची सुरक्षा माझ्यासाठी परमोच्च आहे. माझ्या देशाच्या जवानांना मी त्यांच्या नशिबावर सोडू शकत नाही. त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी संरक्षण सामग्रीची खरेदी वेगाने केली जाईल. माझ्यावर आरोप झाले तरीही मी ते करेन. असेही ते म्हणाले.

9. आम्हीच जिंकणार
२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्हालाच भरघोस यश मिळेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पाच राज्यांतील अपयशाने पक्षाचे मनोबल जराही खचलेले नाही, असे स्पष्ट करीत ते म्हणाले की, २०१९मध्ये लोकांचा पूर्ण विश्वास कमावणारा कुठला पक्ष असेल, तर तो भारतीय जनता पक्षच आहे. तेलंगण आणि मिझोराममध्ये जनतेने आम्हाला संधीच दिली नाही, छत्तीसगढमध्ये कौल आमच्याचकडे आहे आणि राजस्थान, मध्य प्रदेश या दोन राज्यांत प्रत्यक्षात सत्तारूढ पक्षाकडे अगदी निसटते बहुमत आहे, असेही मोदी म्हणाले. या दोन राज्यांतील अकार्यक्षम सरकारच्या आरोपाचा प्रतिवाद आम्ही केला आहेच, असेही ते म्हणाले.

10. महाआघाडीची खिल्ली
येत्या निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली उभी राहात आहे. पण तरीही निवडणुकीची लढत ही जनता विरुद्ध महागठबंधन, अशीच होईल आणि त्यात जनतेचाच विजय होईल, असे मतही त्यांनी मांडले.

11. राजीनाम्याची पूर्वकल्पना
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी, ते राजीनामा देणार असल्याची पूर्वकल्पना मला सहा-सात महिने आधीच दिली होती, असा गौप्यस्फोटही मोदी यांनी केला. आपल्याला व्यक्तिगत कारणांसाठी पदमुक्त करावे, अशी लेखी विनंतीच त्यांनी केली होती. त्यामुळे १० डिसेंबरला त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामागे कोणतेही राजकीय दडपण कारणीभूत नव्हते, असा दावाही त्यांनी केला. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी चांगले काम केले, असे कौतुकोद्गारही मोदी यांनी काढले.

12. मंदिर घटनेच्या चौकटीतच
अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी अध्यादेश काढला जाणार नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राममंदिर उभारणीबाबत अध्यादेश काढण्याचा विचार केला जाईल. आमच्या जाहीरनाम्यातही, हा प्रश्न घटनेच्या चौकटीत सोडवला जाईल, असेच नमूद होते, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button