नोव्हेंबरमध्येही स्वाईन फ्लूचा फैलाव कायम
- सहा दिवसांत १५ नवीन रुग्णांना लागण
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांना लागण झालेल्या स्वाईन फ्लू या आजाराने नोव्हेंबर महिन्यातदेखील आपला फैलाव सुरू ठेवल्याचे चित्र आहे. सहा दिवसांत पंधरा नवीन रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या तोंडावर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने विषाणूजन्य आजारांबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवडय़ात पाच दिवसांत स्वाईन फ्लूची लागण झालेले पंधरा नवीन रुग्ण आढळले. एक आणि चार नोव्हेंबरला स्वाईन फ्लूचे नवीन रुग्ण आढळले नाहीत मात्र इतर दिवशी नियमितपणे नवीन रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले. दोन नोव्हेंबरला पाच नवीन रुग्ण तर तीन नोव्हेंबरला तीन नवीन रुग्ण स्वाईन फ्लूने ग्रस्त झाले आहेत. पाच आणि सहा नोव्हेंबरला (सोमवार, मंगळवार) पाच नवीन रुग्णांना स्वाईन फ्लूचे निदान झाले आहे. त्यामुळे २०१८ मधील स्वाईन फ्लूग्रस्तांची संख्या पाचशे एकाहत्तर एवढी झाली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सातशे सतरा रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यांपैकी सत्तर रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले. तीस रुग्णांच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले, त्यांपैकी तीन रुग्णांना स्वाईन फ्लूचे निदान झाले आहे.
पावसानंतर खबरदारी घ्या
दिवाळीच्या तोंडावर पावसाने पुन्हा आगमन केल्याने वातावरणात बदल झाला आहे. असा बदल विषाणूजन्य आजाराच्या वाढीसाठी पोषक ठरतो. पाऊस, थंडी आणि इतर वेळी वाढलेली उष्णता असे विषम हवामान ताप, सर्दी, खोकला अशा साथीच्या आजारांचा फैलाव होण्यासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे आणखी दोन तीन दिवस शहरात पाऊस झाल्यास नागरिकांनी विषाणूजन्य आजाराकडे दुर्लक्ष करू नये अशी माहिती जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने यांनी दिली.