breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नालासोपारा स्फोटक प्रकरणी ; घाटकोपरमधून एकाला अटक, एटीएसची कारवाई

मुंबई – नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणी मुंबईतील घाटकोपरमधून एका 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केली आहे. अविनाश पवार असं तरुणाचं नाव असून त्याला दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर यांना अटक करण्यात आली आहे.

‘सनातन संस्था’ तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या नालासोपाऱ्यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले  होते. तसेच राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)ही कारवाई करून राज्यात सणासुदीच्या दिवसात घातपात घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावला.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात राऊतचे नाव समोर आल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. पुरेशी माहिती मिळताच मध्यरात्री घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी दोन जणांना एटीएसने अटक केली. त्यातील शरद कळसकर हा नालासोपाऱ्याचा, तर सुधन्वा गोंधळेकर हा पुण्याचा आहे. हे दोघेही राऊतच्या संपर्कात होते. गावठी बॉम्ब बनविण्यासाठी दोघांनी राऊत याला मदत केल्याचे एटीएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

स्फोटक प्रकरणात संशयित असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (41) याला एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. न्यायालयानं श्रीकांतला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे आणि मुंबई येथील एटीएस पथकातील पोलीस श्रीकांतच्या घरावर पाळत ठेवून होते. पूर्ण खात्री पटल्यावर त्याला त्याच्या महसूल कॉलनीतील ‘राधेय’ या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. तो शिवसेनेकडून दोनदा नगरसेवक होता. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्याची जालन्यात ओळख आहे. मध्यंतरी तो जालन्याऐवजी गोवा तसेच कोल्हापूर परिसरात वास्तव्यास होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button