breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नाक मुरडूनही शिवसेना भाजपबरोबरच!

विश्वासदर्शक ठरावानंतर उपसभापती निवडणुकीत पाठिंबा

मुंबई : भाजपच्या विरोधात कितीही थयथयाट केला तरीही शिवसेना भाजपची साथ सोडत नाही हे लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावापाठोपाठ राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला युतीशिवाय पर्याय नाही, असे भाजपच्या धुरिणांचे ठाम मत आहे. गुरुवारच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराने सहज बाजी मारली.

राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत जनता दल (यू)चे हरिवंश नारायण सिंग यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार असून, या मतांसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. शिवसेनेने कोणतेही आढेवेढे न घेता भाजपने पुरकस्कृत केलेल्या जनता दल (यू)च्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शिवसेनेच्या तीन मतांवर डोळा ठेवून राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना रिंगणात उतरविण्याची विरोधकांनी योजना होती. मराठीच्या मुद्दय़ावर शिवसेनेचा पाठिंबा मिळाला असता, असे गणित होते. पण बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांनी भाजपबरोबर जाण्याचे स्पष्ट केल्यावर मतांचे गणित जुळणे कठीण जाईल याचा अंदाज आल्यावर राष्ट्रवादीने उमेदवार उभे करण्याचे टाळले.

गेल्याच महिन्यात लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या वेळीही शिवसेनेने तटस्थ राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली होती. तेव्हा शिवसेनेच्या खासदारांमध्ये गोंधळ झाला होता. कारण अविश्वास ठरावाच्या आदल्या दिवशी मोदी सरकारच्या बाजूने मतदान करावे, असा पक्षादेश प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला होता. पण नंतर शिवसेनेने आपल्या खासदारांना अविश्वास ठरावावरील चर्चा आणि मतदानाच्या वेळी तटस्थ राहण्याचा आदेश दिला. तटस्थ राहून शिवसेनेने भाजपला साथ दिली. भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे तेव्हाही शिवसेनेने टाळले होते. चर्चेत सहभागी होऊन बुलेट ट्रेन किंवा नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्प अशा केंद्राच्या योजनांना शिवसेनेला विरोध करण्याची संधी होती. पण शिवसेनेने ती संधीही गमाविली होती.

भाजपबरोबर युती केल्याने शिवसेनेची २५ वर्षे सडली अथवा यापुढे कदापीही युती करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. भाजपच्या विरोधात शिवसेनेची मंडळी दररोज नाके मुरडत असतात. भाजपही शिवसेनेच्या विरोधात कुरघोडय़ा करण्याची संधी सोडत नाही. भाजपच्या नावे सतत शंख करूनही केंद्र व राज्यातील सत्तेत शिवसेना भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. शिवसेनेने कितीही गमजा मारल्या तरी सत्ता सोडत नाही हे भाजपने पुरेपूर ओळखले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेच्या मदतीची आवश्यकता आहे. कारण भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत होणे भाजपला फायदेशीर ठरणार नाही. मध्यंतरी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीत युती करावी म्हणून भाजपचे प्रयत्न आहे. अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले आहे.

केंद्र व राज्यातील सत्तेत सहभागी असल्यानेच शिवसेनेने भाजपच्या विरोधात उघडपणे जाण्याचे टाळले. पण त्याचा अर्थ पुढील निवडणुकीत युती होईलच असे नाही, अशी शिवसेनेच्या एका नेत्याची प्रतिक्रिया होती.

विश्वासदर्शक ठराव आणि राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपला साथ देऊन शिवसेनेने भाजपच्या विरोधात जाण्याचे टाळले आहे.

राज्यसभेच्या उपसभापतिपदी संयुक्त जनता दलाचे हरवंश नारायण सिंह यांची  गुरुवारी निवड झाली. त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button